पनवेल मनपाच्या महासभेत विकासकामांना मंजुरी
पनवेल : दादाराम मिसाळ
नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक 14 मधील धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा खांदा या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि विद्युत वाहिन्या भूअंतर्गत करणे या कामांना मंजुरी मिळाली आहे.
धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा खांदा येथील नागरिकांना सुविधा मिळविण्याच्या उद्देशाने नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि विद्युत वाहिन्या ही कामे करण्यासाठी पनवेल महापालिकेचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महापालिकेच्या महासभेत हे विषय मंजूर करण्यात आले आहेत.
धाकटा खांदा कामाची अंदाजित रक्कम 10 कोटी 41 लाख रुपये, मोठा खांदा कामाची अंदाजित रक्कम चार कोटी 25 लाख रुपये तर पटेल मोहल्ला कामाची अंदाजित रक्कम सहा कोटी रुपये आहे. या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याने येथील नागरिकांनी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.