अलिबागमध्ये मात्र सावळागोंधळ; ज्येष्ठ नागरिकांची तीन तास रखडपट्टी
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ वर्कर यांच्यासाठी बूस्टर डोस लसीकरण सोमवार (दि. 10) सुरू करण्यात आले आहे. मात्र अलिबागमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन लसीकरण केंद्र वेळेत सुरू न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना तीन तास ताटकळत राहावे लागले.
अलिबागमधील डोंगरे हॉल येथे ज्यांना तिसर्या डोससाठी मेसेज आले होते, असे ज्येष्ठ नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासून बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर दाखल झाले होते. मात्र, डोंगरे हॉल येथील कर्मचार्यांना त्याबाबत कोणतीच माहिती नसल्याने गोंधळ उडाला. अखेर शहरातील ब्राम्हण आळी येथील सावित्री पर्ल इमारतीत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक त्याठिकाणी दाखल झाले. मात्र या लसीकरण केंद्राची स्वच्छता होईपर्यत त्या ज्येष्ठ नागरिकांना काहीकाळ वाट पाहावी लागली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरळीत सुरू झाले.