कर्जतमध्ये रुग्णांचे हाल; नागरिकांचा आरोप

कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील रायगड हॉस्पिटलमध्ये बनविण्यात आलेले कोविड केअर सेंटर हे केवळ निवारा केंद्र असून, तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी दाखल होऊ नये, अशी व्यथा खुद्द कोरोनाचा रुग्ण असलेल्या एका पोलिसाने व्यक्त केली आहे, तर या सेंटरमध्ये दिवसभरात डॉक्टरदेखील फिरत नाहीत, असा आरोप कशेळे येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईक यांनी केला आहे.
केवळ ताप आल्याने कशेळे ग्रामीण रुग्णालयात गावातील व्यापारी आणि त्याचा मुलगा यांची कोरोना टेस्ट केली गेली. त्या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारासाठी त्या दोघांना रुग्णवाहिकेतून रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर 24 तास उलटून गेले, मात्र कर्जत आरोग्य विभाग, आरोग्यसेविका किंवा डॉक्टर यापैकी कोणीही या दोन्ही रुग्णांकडे फिरकलादेखील नाही. रुग्णाची विचारपूस नाही की कोणतेही औषध नाही अशी स्थिती स्वतः कशेळे येथील रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितली. या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार नाही किंवा मार्गदर्शन करायला नर्स वा डॉक्टर 24 तासात एकही फेरी मारत नसतील, तर हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे, असा आरोप उदय पाटील यांनी केला आहे.
मागील आठवड्यात याच कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचारी उद्धव संदीप पाटील यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना फार वाईट अनुभव या कोविड सेंटरमध्ये आला. त्यांनी सांगितले, इथे धर्मशाळेत घातल्यासारखे रुग्णाला सोडून दिले जाते. गरम पाणी काय जेवण चवहीन आणि नित्कृष्ट दर्जाचे असल्याने ते खाण्याची इच्छा झाली नाही. स्वच्छतागृहात अंघोळदेखील करावीशी वाटली नाही. तेथे आपण थांबून उपचार घ्यायचे म्हणजे मरण्यासारखे आहे, म्हणून आपण 28 तास थांबून तेथून निघून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय गाठले. माझ्यामुळे घरातील सर्वांना कोरोना टेस्ट करायला सांगितले, पण कर्जत उपजिल्हा रुग्णालयात गेल्यावर आज स्वॅब घेतले जाणार नाहीत, तुम्ही रायगड हॉस्पिटलला जा, असे सूचविण्यात येते. त्या वेळी माझी पत्नी आपली ओळख सांगत असतानाही स्वॅब टेस्टिंग कक्षातील कर्मचारी उद्धटपणे वागत असतात, अशी तक्रारदेखील पाटील यांनी केली आहे.
रायगड हॉस्पिटलच्या खासगी कोविड रुग्णालयात मात्र रुग्णांना त्यांच्या व्यवस्थापनाकडून चांगली सेवा पुरविली जात आहे. तेथे रुग्णांना एका खोलीत ठेवण्यात येत असून, वेळेवर रुचकर अन्न तसेच सतत डॉक्टरांचादेखील राबता असतो. त्यामुळे रायगड हॉस्पिटलच्या खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये सध्या 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, तर शासनाच्या कोविड केअर सेंटरमध्ये केवळ तीन रुग्ण दाखल आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी म्हणतात…
याबाबत कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, शासकीय कोविड केअर केंद्रात केवळ कोरोना पॉझिटिव्ह आहेत, पण कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना दाखल करतो. त्यांना दिवसभरात आवश्यक असलेले हेल्दी फूड शासनाकडून दिले जाते. ज्या पॉझिटिव्ह रुग्णांकडे घरात जागेची अडचण आहे आणि त्यामुळे घरातील अन्य लोकांना लागण होऊ नये म्हणून आम्ही विलगीकरण कक्ष म्हणजे कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून घेतो. रायगड हॉस्पिटलमध्ये सुरू झालेले खासगी कोविड हॉस्पिटल हे पैसे आकारून सेवा देत आहे. तेथील सेवेबद्दल आम्ही काहीही बोलू शकत नाही.
RamPrahar – The Panvel Daily Paper