Breaking News

नवी मुंबई बाजार समितीत तुफान गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, मात्र काही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेफिकीरी दिसून येत आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सकाळपासून तुफान गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे चित्र बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले. मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नव्हते. तसेच मास्कसुध्दा हनुवटीवर अथवा काहींनी तर घातलेच नव्हते. ज्या एपीएमसी मार्केटमुळे नवी मुंबई परिसरात कोरोना रुग्ण वाढले होते, तसेच चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून एपीएमसी मार्केट हायलाइट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एपीएमसी मार्केटमध्ये दिवसात लाखो लोक येजा करतात. त्यामुळे नवी मुंबईत कोरोना पुन्हा धुडगूस घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र दुसरीकडे एपीएमसी मार्केटच्या पाचही बाजारपेठांत प्रचंड गर्दी केली जात आहे. या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्यात येत नाही आणि तोंडाला मास्कही लावले जात नाही. त्यामुळे अल्पावधीतच कोरोना रुग्ण दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या देण्यात आलेली शिथिलता आणि कोरोना संसर्ग कमी होत गेल्याने काही नागरिकांमध्ये वाढलेली बेशिस्त आणि त्यात एपीएमसी बाजारात नियमांची होणारी पायमल्ली यामुळे कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.

पालिका आयुक्तांच्या आदेशान्वये कारवाई

बेलापूर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच बाजारपेठांमध्ये कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मास्कचा वापर होत नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही सर्वांना विसर पडला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी आता अधिक कठोर भूमिका घेण्याचे ठरवले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याच्या आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशान्वये कारवाई केली जात आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply