रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील गुन्हेगारी संबधातील महिती दिली. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढले आहे. रायगड पोलिसांची ही कामगीरी नक्कीच चागंली आहे, परंतु दुसरीकडे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 82 टक्के असले, तरी आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र 24 टक्के आहे. हे व्यस्त प्रमाण आहे. त्यात सुधारणा करावी लागेल. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आमली पदार्थांचे गुन्हे वाढत आहेत. याला आळा घालणे हे रायगड पोलिसांपुढील आव्हान आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 2021मध्ये 2254 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 2031 गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले. 2020 पेक्षा 2021 मध्ये 273 गुन्हे जास्त घडले आहेत, परंतु मागील वर्षाच्या तुलनेत गुन्हे उघडकीस आण्याचे प्रमाण मात्र जास्त आहे. 2020मध्ये गुन्हे अघडकीस आणण्याचे प्रमाण 79 टक्के होते. यंदा हे प्रमाण 82 टक्के आहे. रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 2021 मध्ये 2254 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 2031 गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले. गुन्हे उघकीस आणण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. 10 टक्के गुन्हे प्रलंबित आहेत. 2020 मध्ये गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 79 टक्के आहे. 2021 मध्ये 38 खुनाचे गुन्हे नोंदविले गेले, त्यापैकी 37 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. खोपोली येथील खून प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. कारण ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, त्याची ओळख पटलेली नाही. खुनाचा प्रयत्न करण्याचे 20 गुन्हे घडले, ते सगळे उघडकीस आले. एक दरोडा टाकण्यात आला होता, तो उघडकीस आला. 23 जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी 13 उघकीस आले. 161 घरफोड्या झाल्या, त्यातील 78 घरफोड्या उघडकीस आल्या. 408 चोरीच्या प्रकरणांपैकी 224 उघडकीस आणण्यात यश आले आहे. गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलीस दल कोकण परिक्षेत्रात सर्वोत्तम आहे. पाच हजार 249 जाणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दोन जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हगारी अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. एकाला स्थानबद्ध करण्यात आले. एका गुन्हेगारास हद्दपार करण्यात आले. तीन गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला. जुगाराच्या 153 ठिकणी कारवाई करून एक कोटी 37 लाख 38 हजार 846 रुपये जप्त करण्यात आले. 437 दारूबंदीच्या कारवाया करून 52 लाख 26 हजार 469 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 10 अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरी यांचे 592 गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी 317 गुन्हे उघडकीस आणून चोरीस गेलेल्या मालापैकी तीन कोटी 31 लाख 88 हजार 237 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. महिला अत्याचाराचे 147 गुन्हे दाखल झाले होते, त्यापैकी 141 गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यात आली. मोटार वाहनांवर कारवाई करून चार कोटी 30 लाख 30 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. 272 बेवारस मोटार वाहनांचा लिलाव करून 34 लाख 10 हजार रुपये शासनाकडे जमा करण्यात आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मूळ मालकांना परत करण्यात आला. या सर्व जमेच्या बाजू आहेत. दुसरीकडे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे, ते नाकारून चालणार नाही. 2021 मध्ये जिल्हा सत्र न्यायालयात 108 खटल्यांचे निकाल लागले. त्यापैकी 26 आरोपींना शिक्षा झाली. याचा अर्थ आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण 24 टक्के आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालायत 1578 खटल्यांचे निकाल लागले. त्यापैकी 1203 आरोपींना शिक्षा झाली. हे प्रमाण 76 टक्के आहे. गुन्हा झाल्यानंतर आरोपींना पोलीस अटक करतात, परंतु न्यायालयात गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्या गुन्हेगाराला शिक्षा होत नाही. गुन्हे सिद्ध करावे लागतात. त्यात पोलीस दल कमी पडतेय, असे दिसतेय. जर आरोपींना शिक्षाच झाली नाही तर ते मोकाट सुटतात. त्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच त्याला शिक्षादेखील होणे तितकेच महत्त्वाचे असते. आरोपीला शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात संघटीत गुन्हेगारी नाही, ही चांगली बाब आहे, परंतु इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अमलीपदार्थ संबंधातील गुन्हे वाढू लागलेत. त्याचे लोण ग्रामीण भागात पसरत आहे. नुकताच नवी मुंबई पोलिसांनी अलिबाग तालुक्यातील पेझारीजवळ एका घरावर छापा टाकून एमडी हा अमली पदार्थ तयार करणार्या टोळीचा पर्दाफाश केला. रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातदेखील अमली पदार्थाचे लोण पसरत आहे. अमली पदार्थ विक्री करणार्या टोळ्यांना आवरणे हे रायगड पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. अमली पदार्थांच्या विळख्यातून रायगडला बाहेर काढण्यास रायगड पोलिसांनी प्राधान्य द्यायला हवे.
-प्रकाश सोनवडेकर