Breaking News

‘रायगड’च्या पायथ्याशी पार्किंग समस्या

शैक्षणिक सहली आणि स्थानिक एसटी फेर्‍यांना अडथळा

महाड : प्रतिनिधी

महाडजवळील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या चित्तदरवाजा येथील अरुंद जागेमुळे गेल्या अनेक वर्षाचा पार्किंगचा प्रश्न आजही कायम आहे. याठिकाणी बेजबाबदारपणे पार्किंग होत असल्याने किल्ले रायगडपासून पुढे जाणार्‍या एसटी बसला हिरकणीवाडी फाट्यापासूनच परतावे लागत आहे. यामुळे शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना किमान पाच किमीचा प्रवास पायी करावा लागत आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात व्हावेत अशी मागणी करूनही याबाबत दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

किल्ले रायगड हा तमाम देशवासियांचे आदराचे ऐतिहासिक स्थळ आहे. यामुळे गडावर प्रतिवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देत असतात. शिवराज्याभिषेक, शिवपुण्यतिथी या दोन कार्यक्रमांना गडावर अलोट गर्दी होत असते. यादिवशीदेखील रायगडाच्या पायथ्याशी आणि रोप वेपर्यंत वाहनांची गर्दी असते. रायगडाच्या पायथ्याशी पुरेशी जागा नसल्याने वाहन पार्किंगचा प्रश्न बिकट आहे. यामुळे वाहने रस्त्याकडेला पार्क केली जात आहेत. अनेकवेळा वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावली जातात. केवळ लहान कार निघून जाईल एव्हढा रस्ता शिल्लक राहतो. यामुळे मोठी वाहने अडकून पडतात. ही अवस्था जशी उन्हाळ्यात होते, तशीच ऐन पावसाळ्यातदेखील होते.

शनिवार आणि रविवारी तर रायगडावर गर्दी होत आहे.  आता गडावर शैक्षणिक सहली वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येणारी वाहने चित्त दरवाजापासून रायगडवाडी गावाकडे तर चित्त दरवाजा ते रोप वेफाटा या रस्त्यावर पार्क होत आहेत. या रस्त्याच्या एका बाजूला किल्ले रायगडाचा डोंगर तर दुसर्‍या बाजूला तीव्र उतार आहे. यामुळे वाहनांना रस्त्याकडेला पार्किंग करावी लागत आहे. मात्र अनेकवेळा ही पार्किंग बेजबाबदारपणे केली जात असल्याने पुढे जाणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

किल्ले रायगडाच्या पुढे रायगडवाडी, छत्री निजामपूर, बावळे, वाघेरी, टकमकवाडी, अशा वाड्या आणि गावे येतात. एसटी महामंडळाच्या बसेसची सुविधा या गावांना आहे. रायगडवाडीपासून चार किमी अंतरावर असलेल्या निजामपूर गावाजवळील रस्ता खराब असल्याने येथील शिंदेकोंडपर्यंत एसटी जाते. मात्र किल्ले रायगडाच्या पायथ्याशी होत असलेल्या वाहतूक कोंडीने एसटी पुढे निघून जाणे कठीण होत आहे. त्यामुळे एसटी रायगड रोप वेकडे जाणार्‍या हिरकणीवाडी फाट्यापासूनच परत फिरते.

रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावर दुतर्फा पार्किंग न करता एकाच बाजूने वाहने पार्किंग केल्यास एसटीसारखी मोठी वाहने सहज निघून जातील आणि पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांनाही  त्रास होणार नाही.

-अमर सावंत, स्थानिक ग्रामस्थ

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply