कर्जत : प्रतिनिधी
नगर परिषद हद्दीतील गुंडगे येथील वाहतुकीला अडथळा ठरणारा धोकादायक ट्रान्सफार्मर अखेर महावितरणने हटविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून गुंडगे प्रभागातील रस्त्याचे क्रॉकीटीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेला ट्रान्स्फार्मर रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मध्यभागी आला. सिमेंट क्रॉक्रिटचा रस्ता बनविताना ट्रान्स्फार्मर अन्यत्र स्थलांतरित करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता घाईघाईत रस्ता बनविण्यात आला. परिणामी हा ट्रान्सफार्मर वाहतुकीला अडथळा ठरू लागला, तसेच ट्रान्स्फार्मरजवळच गजानन पार्क हे रहिवासी संकुल असल्याने येथील लहान मुले खेळतांना, नागरिक येथून ये-जा करतांनाध ोकादायक वाटत असते. त्यामुळे ट्रान्स्फार्मर येथून अन्यत्र स्थलांतरित करावा, अशी मागणी नागरिकांतून होत होती. महावितरणपुढे ट्रान्स्फार्मर अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी जागेचा प्रश्न होता. नगरसेवक गायकवाड यांनी हा प्रश्न सोडविल्याने अखेर धोकादायक ठरणारा ट्रान्स्फार्मर अन्यत्र स्थलांतरित करण्यात आला आहे. या वेळी महावितरणचे शहर शाखा अभियंता योगेश साबळे, सिनियर टेक्निशियन रवींद्र कदम, विद्युत सहाय्यक रोशनी रोकडे, अंजली चिंचोलकर यांनी ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी सहकार्य केले.