पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाच्या 75व्या स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 17 आणि 20 मध्ये मंगळवारी (दि. 18) स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आणि देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 5 स्टार रेटिंगमध्ये समावेश व्हावा यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करून स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊले उचण्यास येत आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 17 आणि 20मध्ये मंगळवारी स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या वेळी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी प्रभाग समिती सभापती तथा नगरसेविका सुशीला घरत, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, राकेश भुजबळ, क्रांतीकुमार चितळे, विजय भुजबळ, अनंत जाधव, किशोर शिंदे, सदाखत अली, पर्यवेक्षक रमेश गरुडे, शरद उरणकर, गौतम जाधव आदी उपस्थित होते.