Breaking News

आशेची चाहूल

ओमायक्रॉनसह आलेल्या तिसर्‍या कोरोना लाटेने मुंबई आणि दिल्लीमध्ये उच्चांकी पातळी पार केली आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या महानगरांमध्ये गेले काही दिवस सलगपणे दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होताना दिसते आहे. हे चित्र निश्चितच आशादायक असले तरी देशाच्या अन्य भागांतील परिस्थिती लक्षात घेता आपल्याला खबरदारी घेणे मात्र आणखी काही काळ सुरूच ठेवावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, तसेच राज्यभरातही कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसतो आहे. कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होताना दिसू लागल्यामुळे तिसर्‍या लाटेने महाराष्ट्रात उच्चांकी पातळी पार केली असल्याची चर्चा निरनिराळ्या स्तरावर सुरू झाली आहे. अर्थात, राज्यात तिसर्‍या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली तरी अद्यापही रुग्णांची संख्या सावधगिरी कायम राखावी इतपत निश्चितच आहे. विशेषत: मुंबईमध्ये बहुदा 15 जानेवारीच्या आसपास कोरोना संसर्गाने उच्चांकी पातळी पार केली असावी असा अंदाज कोविड टास्क फोर्सकडून व्यक्त केला गेला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबई आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या बरीच कमी होईल असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोना संसर्गाच्या लाटेविषयी अंदाज बांधणार्‍या आयआयटी कानपूर येथील प्राध्यापकांनीही मुंबई व दिल्लीतील लाट आता ओसरू लागली असून मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण देशभरात तिसरी लाट ओसरलेली दिसेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई आणि दिल्लीत आता रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी अन्य शहरांमध्ये मात्र येते काही आठवडे ती वाढताना दिसेल असेही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि हरयाणामध्ये तिसरी लाट या आठवड्यात उच्चांकी पातळी गाठेल, तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणी राज्यांमध्ये मात्र पुढच्या आठवड्यापर्यंत आकडे वाढताना दिसतील असा अंदाज आयआयटी कानपूरच्या प्रा. महिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचा व विशेषत: ओमायक्रॉनचा फैलाव अधिक असलेल्या देशांमधून येणार्‍या प्रवाशांबाबत काटेकोर दक्षता घेतल्यामुळे संसर्गाला अटकाव करण्यास विशेष मदत झाल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. अर्थात, तिसरी लाट आटोक्यात राहण्याचे सर्वाधिक श्रेय नि:संशयपणे लसीकरणालाच जाते. केंद्रातील मोदी सरकारने लसीकरणाच्या कार्यक्रमाचा चोख आराखडा आखून दिल्यामुळे देशात लसीकरणाने चांगला वेग घेतला. मुंबईसह राज्यभरात जनतेने लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे तिसर्‍या लाटेची तीव्रता आटोक्यात ठेवण्यास मोठाहातभार लागला. तिसर्‍या लाटेतील कोरोनाबाधितांपैकी लक्षणांची तीव्रता अधिक असणार्‍यांमध्ये, तसेच मृत्यूमुखी पडणार्‍यांमध्येही लसीकरण न झालेल्यांची संख्या ठळकपणे मोठी दिसते आहे. कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर लस घेण्याला पर्याय नाही हे जगभरातच पुरते स्पष्ट झाले आहे. कोरोना महामारीच्या याआधीच्या दोन लाटांच्या दाहक आठवणी अजूनही लोकांच्या मनात जाग्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागताच लोकांनी सरकारकडून प्रसारित नियमावलींचा यंदा सहज स्वीकार केला. या सार्‍याच्या एकत्रित परिणामातूनच तिसरी लाट लवकर आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्थात, राज्यात कोविडच्या चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे हेही लक्षात घ्यायला हवे. परिस्थिती आशादायक दिसू लागली असली तरी गाफिलपणा मात्र परवडणारा नाहीच.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply