आरोग्य यंत्रणा सज्ज
मोहोपाडा ः प्रतिनिधी
ग्रामीण, शहरी, आदिवासी, दुर्गम, औद्योगिक क्षेत्र असणार्या चौक महसूल विभागात 1000 कोरोना रुग्णांचा टप्पा पार झाला असून, त्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, ग्रामविकास, आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोनाने जगभरात हाहाकार माजविला आहे. दरम्यान, नागरिक, डॉक्टर्स, पोलीस, महसूल यंत्रणा, आरोग्य विभाग, सफाई कामगार, सामाजिक संस्था, कार्यकर्ते व सर्वच शासकीय यंत्रणांमुळे कोरोना आटोक्यात येत असतानाच पुन्हा तो उसळी घेताना दिसत आहे.
त्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांत भीतिदायक चित्र आहे. सर्वसामान्य नागरिक कोरोनाचे नियम पाळताना दिसताहेत, तर काही अतिउत्साही लोकांमुळे नियमांची पायमल्ली होत आहे. याला चौक महसूल विभागही अपवाद नाही. चौक महसूल विभागात 50 महसुली गावे आणि 114 वाड्या-वस्त्या आहेत. औद्योगिक क्षेत्र, शहरी, ग्रामीण विभाग, दुर्गम, अतिदुर्गम विभाग, भौगोलिक स्थिती वेगवेगळी, जगातील थंड हवेचे ठिकाण असणार्या माथेरानच्या पायथ्याशी ते टोकापर्यंत वस्ती असणार्या या भागात जवळपास 40 किमी परिघ क्षेत्र असून 70 हजारांवर लोकसंख्या असणार्या भागात कोरोनाचा 1000वा रुग्ण आढळल्याने सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
21 मे 2020 रोजी पहिला पुरुष रुग्ण आढळला, तर 30 जून 2020 रोजी पहिला मृत्यू स्त्रीरूपाने झाला. आतापर्यंत 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू, तर 962 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, या कालावधीत जनजागृती, स्वच्छता, गरजूंना अन्नधान्य वाटप, रोजच्या जेवणाची सोय, परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची सोय करण्यात आली होती. तहसीलदार इरेश चप्पलवार, गटविकास अधिकारी संजय भोये, पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, संजय बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, डॉ. अनिलकुमार शहा, तर लोहोप अंतर्गत लोहोप, वाशिवली, वासांबे, मोहपाडा, रिस येथे डॉ. किरण पवार, तर चौक, हातनोली, बोरगाव, कलोते येथे डॉ. नूतन, डॉ. प्रतिभा, डॉ. मनीषा तांदले, सर्व परिचारिका, आरोग्य कर्मचार्यांनी मेहनत घेऊन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. या सर्वच यंत्रणांबरोबर या विभागाचे मंडळ निरीक्षक नितीन परदेशी यांनी सहकार्य करून मोलाची कामगिरी बजावली.