मुंबई : प्रतिनिधी
पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार संबंधित ठिकाणी बुधवारपासून (दि. 29) आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार 5 जुलै रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. त्यानंतर 12 ते 19 जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. 16 आणि 17 जुलै रोजी शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत, तर 20 जुलै रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट रोजी होईल.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …