Breaking News

नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचार्‍यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन

पेण ः प्रतिनिधी

नोंदणी व मुद्रांक विभागाचे अराजपत्रित अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या विविध मागण्या शासनाकडे मांडल्या, मात्र प्रत्येक वेळी शासनाकडून निराशाच पदरी पडत असल्याने नोंदणी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने गुरुवारपासून (दि. 1) बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

या लेखणी बंद आंदोलनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे काम तसेच इतर कामे बंद राहणार आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी मागील दोन-तीन वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांबाबत शासनाकडे निवेदन देत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सर्व संवर्गांतील रखडलेल्या पदोन्नत्या तत्काळ करणे, कोरोना महामारीमध्ये मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी हे शासनाचे 30 टक्के उपस्थितीचे आदेश असताना 100 टक्के उपस्थितीत काम करीत आहेत, तथापि विभागातील कर्मचार्‍यांनी मागणी करूनसुद्धा शासनाने जीवन सुरक्षा विमा कवच लागू केले नाही. तुकडेबंदी कायद्याने होणारी कारवाई, रेरा कायद्यानुसार होणारी कार्यवाही या सर्व मागण्यांबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

याचबरोबर आयकर विभागाचे विवरणपत्र, पोलीस विभाग व इतर विभागांकडून मागितली जाणारी माहिती, ई-सरिता, ई-फेरफार, ग्रास व आधार सर्व्हर आदी मागण्यांबाबत शासनाचे दुर्लक्ष होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये कोणत्याही सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. या सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचारी गुरुवारपासून लेखणी बंद आंदोलन करणार असल्याची माहिती पेणचे दुय्यम निबंधक अधिकारी संजय घोडजकर यांनी दिली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply