Breaking News

कडाक्याच्या थंडीचा पशू-पक्ष्यांना फटका; पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या मृत; व्यावसायिक चिंतेत

पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात मागील आठवडाभरात पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा फटका माणसांसह पशू-पक्ष्यांनादेखील बसला आहे. स्थलांतरित पक्ष्यांची वाताहत झाली आहे. चिमण्या, पाकोळी, धूळ पाकोळी, कोकीळ व कोंबड्या अशा शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासक व प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांच्या पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या मेल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झालेत. माणगाव तालुक्यातील पाटणूस शाळेतील शिक्षक व पक्षी अभ्यासक राम मुंढे विळे गावातून सायकलवरून जात होते. सकाळी थंडी खूप होती. धूळ पाकोळी नावाचा पक्षी रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली निपचित पडलेला त्यांना आढळून आला. हातात घेऊन पाहिले असता तो थंडीने पूर्णपणे गारठलेला आणि थरथर कापत होता. त्यांनी त्याला त्यांच्या बॅगमध्ये अगदी सुरक्षित ठेवलेे. दर 30 मिनिटांनी त्याचे निरीक्षण केले. बॅगमध्ये उबदार वातावरण असल्याने तो शांत बसून होता. त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या सोडून दिले. त्या वातावरणात त्याचे साथीदार आणि जोडीदार असल्याने तो पुन्हा मिसळून गेला. रोहा तालुक्यातील कोलाड येथील वाईल्डर वेस्ट अ‍ॅडव्हेंचर रेस्क्यू टीमचे सदस्य व वन्यजीव रक्षक सागर दहिंबेकर यांना येथील जंगलात थंडीमुळे अनेक चिमण्या व पाकोळी पक्षी मेलेले व निपचित पडलेले आढळले. थंडी असल्याने त्यांना उडता येत नव्हते. तसेच झाड व घरावर त्यांना बसता येत नाही. थंडीमुळे निपचित पडलेल्या कोकीळेला दहिंबेकर यांनी जीवदान दिले, तर शुभम सुतार या पोल्ट्री व्यावसायिकाच्या 190 कोंबड्या थंडीमुळे मृत पावल्या आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

अचानक आलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम पक्ष्यांवर अधिक प्रमाणात दिसून येत आहे. छोट्या पक्ष्यांना अधिक फटका बसला आहे. त्यामुळे विविध ठिकाणी थंडीने पक्षी मृत व जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

-राम मुंढे, पक्षी अभ्यासक व निरीक्षक

 

जानेवारी महिन्यामध्ये जम्मू-कश्मीर व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये होणार्‍या अति बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहर निर्माण झाली आहे. यामुळे आपले पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाय योजले जावेत. थंडीमुळे रक्तभिसरण संस्थेवर परिणाम होऊन कार्डीऍक अरेस्ट किंवा कोल्ड शॉकने पक्ष्यांची गती मंदावते किंवा मृत्यूही होतो.

-डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी,सुधागड-पाली

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply