माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे वक्तव्य
श्रीवर्धन : प्रतिनिधी
महाविकास आघाडी ही आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी केलेली तडजोड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर शिवसेना काँग्रेसी विचाराची कशी होऊ शकते? त्यामुळे सर्व स्थानिक स्वराज्य समित्यांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रागवलीत केले.
राष्ट्रवादीचे माजी जि. प. सदस्य अविनाश कोळंबेकर यांनी गीतेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमात शिवसेनेने राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.
गीते म्हणाले,राज्यात आपले सरकार आहे. आपले कशासाठी तर मुख्यमंत्री आपले आहेत. सरकार आघाडी सांभाळेल आपली जबाबदारी आपले गाव सांभाळायची आहे. गाव सांभाळताना फक्त शिवसेनेचा विचार करायचाय. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय. आमचा एकच नेता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बाकी किती कोण कोणाला जाणता राजा म्हणत असू दे, आमचा दुसरा नेता होऊच शकत नाही. सत्तेसाठी तडजोड केलेली आहे. आघाडी ज्या दिवशी तुटेल तेव्हा तुटेल, माझा शाप नाही आघाडी तुटू दे, पण जेव्हा आघाडी तुटेल तेव्हा आपण आपल्याच घरी जाणार शिवसेनेतच जाणार, असे सूचक वक्तव्य या वेळी शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केले. तटकरेंनी लक्षात ठेवावे तुमच्यासाठी मैदान कधीच मोकळे होणार नाही. त्यांनी सातबार्यावर अतिक्रमण केले आहे. त्यांचे अतिक्रमण उतरवायचे आहे. श्रीवर्धन मतदारसंघ कोणालाही आंदण दिलेला नाही, असे वक्तव्य अनंत गीते यांनी केले.
पक्ष प्रवेशकर्ते अविनाश कोळंबेकर म्हणाले की, राष्ट्रवादीत साडेतीन वर्षात दिलेल्या कामचा एकही प्रस्ताव मंजूर केला नाही. प्रशासकीय मान्यता आणायला सुतारवाडीला आणायला जावे लागते, वर्कऑर्डरचा मात्र पत्ता नाही. अशी परिस्थिती राष्ट्रवादीत आहे, तसेच कोळंबेकर यांनी या वेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दर्शन विचारे यांच्यावरही घणाघात केला. या कार्यक्रमात शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सूडबुद्धीने वागतात -आमदार महेंद्र थोरवे
अविनाशजी आपण शिवसैनिक होतात, पण राष्ट्रवादी पक्ष हा रायगडला लागलेला शाप आहे. इथे भूलभुलय्या करणार्यांची कमी नाही. पालकमंत्री सूडबुद्धीने वागत आहेत. शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. त्याचे अतिशय दुःख होत आहे. आघाडीचा धर्म कुठेही पाळत नाहीत. ही आघाडी आम्हाला मान्य नाही, असे आमदार महेंद्र थोरवे या वेळी म्हणाले.