पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकदिवसीय प्रदर्शन गुरुवारी (दि. 10) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमेाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, प्रभाग ‘अ’च्या समिती सभापती संजना कदम, नगरसेवक अनिल भगत, अब्दुल मुकीद काझी, नगरसेविका दर्शना भोईर, सुशिला घरत, उपआयुक्त विठ्ठल डाके, गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, स्वच्छ भारत कोऑर्डीनेटर मधुप्रिया आवटे, सदाकत अली तसेच अधिकारी उपस्थित होते. या प्रदर्शनामुळे टाकाऊ कचर्यापासून सुध्दा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेश पालिका क्षेत्रातील नागरिकांना मिळणार आहे तसेच सुक्या कचर्याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे हे या प्रदर्शनातून नागरिकांना समजू शकणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या स्पर्धेत यशस्वी होणार्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
वाराणसीमध्ये झालेल्या महापौर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक टास्क दिला होता की, तुमच्या पालिका हद्दीतील सर्व नागरीकांचा समावेश होईल व ते भाग घेतील अशी स्पर्धा घ्या. त्याप्रमाणे आम्ही नगरसेवकांनी आणि आयुक्त, उपायुक्त यांनी चर्चा करून टाकाऊ कचर्यापासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा घेतली. यामध्ये 90 पेक्षा जास्त जणांनी भाग घेतला. या प्रदर्शनामुळे कचर्यापासूनसुध्दा टिकाऊ वस्तूंची निर्मिती होऊ शकते याचा उत्तम संदेश मिळणार आहे.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर