Breaking News

कर्नाळा बँक प्रकरणात पुन्हा ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा स्वयंघोषित समाजसेवक आणि लोकप्रतिनिधीचा केविलवाणा प्रयत्न

पनवेल : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या अर्थ खात्याने बँकेतील ठेवींवरील विम्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आता कर्नाळा नागरी बँकेच्या ठेवीदारांना एक लाखांऐवजी थेट पाच लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’, या धर्तीवर ‘आमच्याच प्रयत्नाने हे झाले’, अशी आवई उठवायला सुरुवात स्वयंघोषित समाजसेवक आणि लोकप्रतिनिधीने केली आहे.
कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी आणि कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे संरक्षण म्हणून इन्शुरन्समधून पैसे देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाचा फोडली.
(या काळात तर ‘कर्नाळा बँक ठणठणीत, विवेक पाटील यांची प्रकृती उत्तम’, अशा आशयाचे वृत्त स्वयंघोषित समाजसेवकाने प्रसिद्ध केले होते.) आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून मागणी, मोर्चे, आंदोलन, पाठपुरावा या सर्व लढाया लढल्यानंतर हे यश ठेवीदारांच्या पदरात पडले आहे.
आता स्वयंघोषित समाजसेवक आणि एका लोकप्रतिनिधीने उसने अवसान आणून ‘हे आम्हीच केले’, असा आव आणून छाती बडवायला सुरुवात केली आहे. कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे विवेक पाटील यांनी बुडविल्यानंतरही शेकापने कधीही ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढले नाहीत आणि साधी मागणीही केली नाही. फक्त बँक बुडवणार्‍या म्होरक्या विवेक पाटलांना कसे वाचवता येईल याचेच प्रयत्न शेकापकडून आजही सुरू आहेत.
केंद्र सरकारने यापूर्वी दिलेल्या विमा संरक्षणात वाढ केली. पूर्वी एक लाख रुपयांच्या ठेवींना विमा संरक्षण होते, मात्र दूरदृष्टी असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संरक्षण रक्कम पाच लाखांनी वाढवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे हा निर्णय भाजप सरकारने ठेवीदारांच्या हितासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.
ठेवीदारांना पैसे मिळोत न मिळो फक्त आणि फक्त विवेक पाटील घोटाळ्यातून बाहेर पडावेत यासाठी शेकापने प्रयत्न केले आहेत, मात्र असे असतानाही आता त्याचे श्रेय घेण्यासाठी शेकाप नेत्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. वास्तविक केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ठेवीदारांना विम्याच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत, याचा सोयीने विसर शेकापच्या नेत्यांना पडला आहे.
’होय मीच पैसे घेतले’, असे छातीठोकपणे सांगणारे विवेक पाटील यांच्याकडे गडगंज मालमत्ता असताना ती विकून गोरगरीब ठेवीदारांचे पैसे शेकापने का मिळवून दिले नाहीत, हा प्रश्न उपस्थित होतो. शेकापचे आयत्या बिळावरचे नागोबा असलेले पुढारी तेव्हा गप्प का राहिले. जर लोकांचे पैसे तेव्हाच दिले असते तर विवेक पाटलांना जेलची हवा खावी लागली नसती, मात्र विवेक पाटलांची मग्रुमी कमी करण्यासाठी तर शेकाप नेत्यांची हा डाव रचला नव्हता ना, असा संशयही निर्माण होत आहे.
पैसे बुडल्याचे समजल्यावर, ठेवीदारांचे स्वप्नातील घर स्वप्नातच राहिले, अनेकांची लग्न झाली नाहीत, अनेकांचे वैद्यकीय उपचार झाले नाहीत आणि त्यातून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, मात्र त्यावेळी विवेक पाटलांच्या आणि शेकाप नेत्यांच्या डोळ्यात एकही अश्रू आला नसेल जेलमध्ये गेल्यावर नक्कीच अश्रू अनावर झाले नसतील. विवेक पाटील कधी बाहेर येतात याची शेकापच्या ढोंगी पुढार्‍यांना उत्सुकता लागली असेल, पण लोकांची कोटींची मालमत्ता हडप करून विवेक पाटील उजळ माथ्याने फिरू शकतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘हे पैसे नरेंद्र मोदी सरकार मुळेच मिळतायेत; राज्य सरकार आणि शेकापचा काहीही संबंध नाही’
कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यामुळे मिळाले म्हणून सर्व प्रथम मी त्यांचे आभार मानतो. कर्नाळा बँकेचे ठेवीदार डिपॉजीटर इन्शुरन्स स्कीम पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत मंजूर केले, म्हणून पुर्वी एक लाखाची डिपॉजीटर इन्शुरन्स स्कीम होती ती आता पाच लाख करण्यात आली. त्यामुळे ठेवीदारांना आता इन्शुरन्सचे पैसे मिळणार आहेत. काही लोकांनी अशी आवई उठवली की, हे पैसे शेकापने आणले आहेत. माझे असे सांगणे आहे की, तुम्ही केलेल्या फ्रॉडचे पैसे इन्शुरन्समार्फत पंतप्रधान मोदीसाहेब देतायेत, असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडीने कर्नाळा बँकेतला हा फ्रॉड पाठीशी घातला आहे, म्हणून ते अजून दोषी संचालकांना अटक करीत नाही. कर्नाळा बँकेचे पैसे विवेकानंद पाटलांनी खाल्ले, म्हणून ते आठ महिने जेलमध्ये आहेत. ही परिस्थिती असताना शेकापची मंडळी असे म्हणण्याचे धारिष्ट्य करतात की, हे पैसे बाळाराम पाटलांनी आणलेत. याचा अर्थ या चोराच्या उलट्या बोंबाच नाहीत का, असा प्रश्न आमदार महेश बालदी यांनी विचारला. आता उर्वरित पैसे लोकांना कसे मिळतील यासाठी आमची संघर्ष समिती प्रयत्न करीत राहिल, अशी ग्वाही आमदार बालदी यांनी दिली.

‘बाळाराम पाटील, खालील प्रश्नांची उत्तरे द्या’
कर्नाळा बँकेचे 528 कोटी रुपये विवेक पाटील यांनी बुडवूनदेखील शेतकरी कामगार पक्ष मात्र असा दावा करीत आहे की, आम्ही ठेवीदारांचे संरक्षण करीत आहोत. आमचा शेकापला असा सवाल आहे की, ज्या बोगस खात्यातून विवेक पाटलांनी पैसे हडप केले त्या खातेदारांपैकी अनेक खातेधारक हे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आहेत. या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात का? विवेक पाटलांच्या पापात शेतकरी कामगार पक्ष सहभागी आहे का, असे प्रश्न कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी आणि कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचारले आहेत.

‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’
कालपासून शेकाप नेत्यांना उसने स्फुरण चढलेले आहे. कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांना विमा कंपनीचे पैसे मिळणार, अशी बातमी कळताच ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ अशी गत बाळाराम पाटलांची झालेली दिसतेय. आधी एखाद्याला जाणून बुजून गाडीने उडवून तो मेल्यावर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विमा कंपनीचे पैसे मिळवून देण्यासारखा हा प्रकार झाला. शेकाप नेत्यांनी भ्रष्टाचार करून बँक बुडवली. सामान्य ठेवीदारांचे पैसे लुबाडून स्वतःच्या तुंबड्या भरल्या आणि आता त्याच ठेवीदारांना विम्याचे पैसे आम्ही मिळवून दिले अशी छाती आता शेकाप नेते बडवू लागले आहेत. बाळाराम पाटलांनी जाहीर करावे की आम्ही बँक जाणून बुजून बुडवली आणि आता ठेवीदारांना विमा कंपनीचे पैसे जे मोदी सरकारने केलेल्या कायद्यामुळे मिळत आहेत. ही हिम्मत बाळाराम पाटील दाखवतील काय? जवळपास 50 हजार ठेवीदारांचे वाटोळे केल्यानंतरही बाळाराम पाटील आता खुशाल गमजा मारत सुटले आहेत, विशेष म्हणजे जणू हे पैसे विवेक पाटीलच देणार आहेत, असे बाळाराम पाटील भासवत असून ते ठेवीदारांची आणि जनतेची दिशाभूल करीत आहे. फुकटचा संधीसाधूपणा आणि बेताल वक्तव्य करत बाळाराम पाटील यांनी पुन्हा एकदा स्वतःची निष्क्रियता सिद्ध केली आहे.

तर टांगा पलटी, घोडे फरार
कर्नाळा बँकेत पाचशे कोटी रुपयांहूनही अधिक रकमेचा घोटाळा होऊनही महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ‘शेकाप’च्या विवेक पाटील यांच्यावर आतापर्यंत राज्य सरकारने कोणतीच कारवाई केली गेली नाही. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ठेवीदारांना आता पैसे मिळणार आहेत. त्यातील एकही नवा पैसा विवेक पाटलांचा नाही. (जो त्यांनी हडप केलेला आहे.) ईडीने कारवाई करून तपासही केला, मात्र राज्य सरकारने या प्रकरणी इकडची फाईल तिकडे सुद्धा केली नाही आणि त्यांच्याकडील फाईलवरची धूळही झटकली नाही. त्यामुळे विवेक पाटलांनी हडप केलेली रक्कम त्यांच्याच पदरात अजून शाबूत आहे. घोटाळा करूनही जर त्यांच्या मालमत्तेवर टाच येत नसेल तर ‘टांगा
पलटी, घोडे फरार’ असे म्हणणे योग्य ठरेल.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply