बाजारात ओला व 50 टक्के खराब माल
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
एपीएमसीच्या कांदा बाजारात सध्या नवीन कांद्याची आवक वाढली असून दिवसाला 100 गाड्या कांदा येत आहे, मात्र यातील 50 टक्के कांदा हा खराब आहे. अवकाळी पावसामुळे या वर्षी कांदा उत्पादनावर हा परिणाम झाल्याचे दिसत असून कांदा दर चढेच राहतील अशी शक्यताही व्यापारी व्यक्त करीत आहेत.
घाऊक बाजारात कांदा दर प्रतिकिलो 20 ते 30 रुपयांवर स्थिर आहेत. नवीन कांदा हंगामात राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने तोडणीला आलेले उत्पादन खराब झाले आहे. कांदा पिकाला गरजेपेक्षा अधिक पाणी मिळाल्याने मालाच्या दर्जावर परिणाम झाला आहे.
बाजारात दररोज 100 गाडी कांदा आवक होत आहे. मात्र यामध्ये आतून ओलसर असलेला कांदा सर्वाधिक आहे. हा कांदा केवळ एक-दोन दिवसच टिकत आहे. त्यामुळे दर्जदार मालाला मागणी असताना पुरवठा करता येत नाही.
हवामान बदलाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे छोट्या शेतकर्यांनी तर कांदा काढणीऐवजी पिकात जनावरे सोडण्यास पसंती दिली आहे. साधारण एक एकर शेतात कांद्याच्या दोनशे ते अडीचशे गोणी उत्पादन होत असते. या हंगामात फक्त 20 ते 30 गोणी उत्पादन मिळाले आहे. त्यातही फक्त दहा गोणी दर्जेदार कांदा आहे. त्यामुळे बाजारात कांदा पाठवणे शेतकर्यांना परवडत नाही, असे आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे येथील शेतकरी राजू खिरड यांनी सांगितले.
दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान नवीन कांदा आवक वाढल्यानंर कांदा दरात घसरण होते. दरवर्षी घाऊक बाजारात या काळात प्रतिकिलो कांद्याचे दर 10 रुपयांच्या खाली असतात. मात्र यंदा प्रतिकिलोचे दर 20 ते 30 रुपयांवर स्थिर आहेत.
बाजारात मोठ्या प्रमाणावर नवीन कांद्याची आवक होत आहे. मात्र अवकाळी पावसाने उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात ओलसर कांदा अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कांदा दर चढेच राहणार आहेत.
-मनोहर तोतलानी, व्यापारी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती