खोपोलीतील पक्षीप्रेमींची कारवाईची मागणी
खालापूर : प्रतिनिधी
रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोड करीत असताना गुरुवारी (दि. 20) खोपोलीतील हनुमान मंदिरासमोरील जांभळाच्या झाडावरील पोपटांच्या घरट्यांचे नुकसान झाले. या घटनेत पोपटांच्या 14 पिल्लांचा मृत्यू, तर आठ पिल्ले जखमी झाली. या पोपटांच्या मृत्यूस कारणीभूत असणारा ठेकेदार व वृक्षतोड करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खोपोलीतील पक्षीप्रेमी करीत आहेत. मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासाठी करण्यात येत असलेल्या वृक्षतोडीकडे रस्ते विकास महामंडळ कानाडोळा करीत असतानाच गुरुवारी खोपोलीतील हनुमान मंदिरासमोरील जांभळाच्या वृक्षावर कुर्हाड चालविण्यात आली. या वेळी झाडावर असलेल्या पोपटांच्या घरट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घरट्यांमध्ये असलेली पोपटांची आठ पिल्ले बचावली असली तरी 14 पिल्लांचा मृत्यू झाला. खोपोलीतील पर्यावरणप्रेमी मनोज कळमकर, विकी भालेराव, दिनेश ओसवाल, अमोल कदम, अशोक मेस्त्री, हनिफ कर्जीकर, गुरुनाथ साठेलकर यांनी बचावलेल्या पोपटांना ताब्यात घेतले. दरम्यान, लोणावळा येथील शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड यांनी या पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. जखमी पक्ष्यांवर खालापुरात उपचार करण्यात आले असून, त्यांचे संगोपन, देखभाल व उपचारासाठी हे पक्षी लोणावळ्याचे पक्षीमित्र सुनील गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. त्यांची माहिती शिवदुर्ग मित्र मंडळ दर आठ दिवसांनी खालापूर वनाधिकार्यांना पाठविणार असल्याची माहिती वनाधिकारी आशिष पाटील यांनी दिली.
वृक्षतोड करताना संबंधित ठेकेदार व खोपोली मुख्याधिकारी यांनी दक्षता घेणे गरजेचे होते. सदर घटनेबाबत त्यांना लेखी नोटीस पाठविण्यात आली असून, त्यांच्या उत्तरानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.
-आशिष पाटील, वनाधिकारी, खालापूर