Breaking News

आदित्य ठाकरेंना इतिहास माहीत नाही; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

पणजी ः वृत्तसंस्था

गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली होती. त्याला रविवारी (दि. 13) महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरेंना इतिहास माहीत नाही, असे या वेळी फडणवीस म्हणाले. भाजपने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणतानाच आदित्य ठाकरे यांनी भाजपचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत राज्याबाहेर इतर ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत, असा दावा केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आदित्य ठाकरेंना इतिहास माहीत नाही. याआधी भाजप सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती, पण गोव्याने प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारले. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजप लढतेय म्हणून ते लढले नाहीत? गेली 20-25 वर्षे हे लोक लढत आहेत, पण त्यांचे डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात. महाराष्ट्रात भाजपसोबत युतीमध्ये शिवसेना निवडून आली. भाजपच्या स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या मुख्यमंत्र्याची घोषणा केली. त्याला तुम्ही समर्थन दिले. तुमच्या सगळ्या लोकांनी पंतप्रधान मोदींचा फोटो लावून मते मागितली. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही युतीधर्म मोडला आणि विरोधकांसोबत गेलात. राज्याच्या जनतेला नीट माहिती आहे की कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply