Breaking News

वाशी बस टर्मिनलचे काम प्रगतीपथावर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

वाशी बस आगाराच्या जागेत उभे राहत असलेल्या बस टर्मिनलचे काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणी 21 मजली इमारत उभी राहणार असून नऊ मजल्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. वर्षभरात जून 2023 पर्यंत इमारत उभारणीचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एनएमएमटी व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे.

वाशीतील बस आगार म्हणजे सर्व बसगाड्यांसाठीचे टर्मिनल ठिकाण आहे. भविष्याचा विचार करता, आगाराच्या जागेवर बहुमजली इमारत बांधण्याचा निर्णय नवी मुंबई पालिकेकडून घेण्यात आला आहे. इमारतीच्या माध्यमातून परिवहनसाठी उत्पन्न वाढीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे, हा त्या मागील मुख्य हेतू होता. दहा वर्षांहून अधिक काळापासून या बस आगाराच्या विकासाचा विषय चर्चेत होता, मात्र अनेक परवानग्या मिळण्यात आलेल्या अडचणीमुळे प्रकल्पाची रखडपट्टी झाली.

अखेर 2018 मध्ये बस टर्मिनलच्या उभारणीसाठी सल्लागारांची नेमणूक करून बहुमजली इमारतीमध्ये आणि प्रशस्त टर्मिनलमध्ये रूपांतर करण्याचे ठरले. त्यानुसार 2019 मध्ये या बस आगाराच्या विकासाला सुरुवात करण्यात आली.

बस आगाराच्या जागेवर, बस स्थानकांसह वाणिज्य संकुल उभारण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार 159 कोटी 80 लाख रुपये खर्च करून 21 मजली इमारत उभारली जात आहे. त्यात खाली आधुनिक बस आगार, त्यावर तीन मजली वाहन पार्किग, वाणिज्य संकुल उभारले जाणार आहे. मार्च 2021 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र दोन वर्षे कोरोनामुळे तसेच सीआरझेडच्या नियमांमुळे हे काम रखडले होते. आता कोरोनाबरोबरच सीआरझेडच्या कचाट्यातून सुटका झाल्याने टर्मिनलचे काम वेगाने सुरू झाले आहे.

वाशी आगाराच्या जागवेर 21 मजली वाणिज्य संकुल उभारले जाणार आहे. त्यात तळ मजल्यावर एनएमएमटीचे अत्याधुनिक असे स्वतंत्र बस स्थानक उभारले जाणार आहे. त्यावरील तीन मजल्यांवर वाहनतळ उभारले जाईल आणि त्यावरील मजल्यांवर वाणिज्य व व्यावसायिक कार्यालये उभारून भाड्याने दिली जातील. हे तीन मजली वाहनतळ व्यावसायिक कार्यालयांसाठी असेल.

एनएमएमटीच्या वाशी येथील बस टर्मिनलच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. ठरलेल्या वेळेत जून 2023 पर्यंत कामांची डेडलाईन असून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

-योगेश कडुसकर, परिवहन व्यवस्थापक, एनएमएमटी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply