अहमदनगर ः प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाइन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करताय, ते पाहून मला अशा सरकारच्या राज्यात जगायची इच्छाच उरलेली नाही, असे व्यथित उद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले आहेत. ते रविवारी (दि. 13) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातूनही सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहेत. अशातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून येत्या 14 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, राळेगणसिद्धीत रविवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी अण्णा हजारेंना वय लक्षात घेत उपोषण न करण्याचे आवाहन केले. त्यानुसार अण्णांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे. या वेळी अण्णा हजारे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी कीर्तनकार कीर्तन करतात, पण सरकार किराणा दुकानात वाइन ठेवून ते क्षणात धुळीस मिळवत आहे. हे सर्व बघून आता जगण्याची इच्छा होत नाही, असा संताप अण्णांनी व्यक्त केला. आयुष्याची 84 वर्ष झालीत, तेवढी पुरेशी आहेत, असे म्हणताना अण्णा भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध दर्शविला होता. ‘काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक व विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते, पण या निर्णयामुळे लहान मुले, तरुण व्यसनाधीन होऊ शकतात, महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार राज्य सरकारने केलेला दिसत नाही याची खंत वाटते. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणार्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे,’ असे अण्णांनी म्हटले होते.
असे निर्णय घेताना सरकारने जनतेच्या भूमिका जाणून घेणे गरजेचे असून तसे न झाल्यास याला लोकशाही कसे म्हणता येईल. ही हुकूमशाहीच आहे.
-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक