Breaking News

नौटंकीचे राजकारण

भ्रष्टाचाराच्या नव्या आरोपांनी घायाळ झालेले महाविकास आघाडीचे नेते आक्रमक प्रत्युत्तराच्या नादात दिवसेंदिवस आणखी गाळात रुतत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या धमक्या असोत किंवा नाना पटोले यांची नौटंकी या दोहोंचा भाजपवर परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही. उलटपक्षी महाविकास आघाडीची विश्वासार्हता मात्र दिवसेंदिवस धुळीला मिळत चालली आहे.  कोविड केंद्रातील भ्रष्टाचाराची प्रकरणे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी एकेक करून जाहीर करायला सुरूवात केल्यानंतर सत्ताधारी आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले. त्याची परिणती पुणे महापालिकेच्या पायर्‍यांवर सोमय्यांना धक्काबुक्की करण्यात झाली. सोमय्या यांच्या धडाकेबाज राजकारणामुळे हादरलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना नाही नाही ते शिव्याशाप दिले आणि सोमवारी तर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘बहुत बरदाश्त किया, अब बरबाद करेंगे’, अशी धमकी देण्यापर्यंत मजल गेली. अर्थात राऊत यांच्या धमक्या-दरडावण्यांना भाजपमध्ये कुणी मनावर घेत नाही आणि महाराष्ट्रातील जनतादेखील त्यांना गांभीर्याने घेत नाही. संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदांमधून आमचे भरपूर मनोरंजन होते, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोमंतकाच्या दौर्‍यावर असताना मारला. तो चांगलाच वर्मी लागला आहे असे दिसते. ‘भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगाच्या कोठडीत असतील. जेथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेत आहेत, त्याच कोठडीत त्यांची रवानगी होईल’, अशा गमजासुद्धा राऊत यांनी मारल्या. भाजप नेत्यांच्या कथित भ्रष्टाचाराचे पुरावे राज्य सरकारकडे असतील तर त्यांनी खुशाल कारवाई करावी. सरकार त्यांचेच असल्यामुळे त्यांना कुणीही अडवलेले नाही, पण न्यायालयात अथवा पोलिसांकडे न जाता महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषद कशासाठी घेत आहेत, असा प्रश्न पडतो. नेमका हाच प्रश्न सोमय्या यांनी सत्ताधार्‍यांना विचारला आहे. त्याचे उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना उघडपणे देता येत नसले तरी जनता त्यांची नौटंकी पुरेपूर ओळखून आहे. संजय राऊत यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनोरंजनाचा ठेका घेणारे दुसरे नेते म्हणजे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले हे होय. पटोले यांना नौटंकीच्या राजकारणाची खोडच आहे. किंबहुना, त्याशिवाय त्यांना दुसरे काही जमतच नाही असा सूर आता काँग्रेस पक्षातच कुजबुजत्या आवाजात आळवला जात आहे. मोदी यांनी माफी मागावी तसेच भाजपच्या नेत्यांनीदेखील माफी मागावी, अशी हास्यास्पद मागणी करत नाना पटोले यांनी सोमवारी काँग्रेसचे आंदोलन छेडण्याची घोषणा केली होती. फडणवीस यांचे मलबार येथील सरकारी निवासस्थान असलेल्या बंगल्यासमोर काँग्रेसी आंदोलकांनी मोर्चा न्यावा, असे आवाहन पटोले यांनी केले होते, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी उग्र रूप दाखवताच सकाळी अकराच्या सुमारास आंदोलन गुंडाळून पटोले यांच्या अनुयायांना अक्षरश: मैदानातून पळ काढावा लागला. जनतेच्या दृष्टीने हा साराच विनोदी प्रकार होता. मुंबईत आंदोलन छेडण्यासाठी ताकद लागते. ती काँग्रेस पक्षाच्या मनगटात उरलेली नाही. तरीही विनाकारण नौटंकीचे राजकारण करून पटोले स्वत: तोंडघशी पडले आणि आपल्या पक्षालाही त्यांनी निराश केले. अशा प्रकारांमुळे तात्पुरती प्रसिद्धी मिळते, पण कार्यकर्त्यांचे मनोधैर्य कायमचे खचते हे साधे भान काँग्रेसच्या नेत्यांना उरलेले नाही. नौटंकीचे राजकारण मतदारांना आकृष्ट करू शकत नाही याचे भान सत्ताधार्‍यांनी ठेवले तर ते त्यांच्याच हिताचे आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply