Breaking News

मतदारराजा उत्तीर्ण

आपल्याला पुन्हा एकवार देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये सोपवायचा आहे, या भावनेने आपण घराबाहेर पडल्याचे पनवेल, खारघर, कर्जत, उरण येथील कित्येक मतदारांनी नमूद केले. इथल्या मराठी मतदारांसोबतच बिगर-मराठी, जैन व गुजराती समाजातील मतदारांनीही ही भावना उघडपणे व्यक्त केली.

यंदाची लोकसभेची निवडणूक जितकी अटीतटीची आहे, तितकीच ती जनतेची लोकशाहीवरची श्रद्धाही अधोरेखित करणारी ठरत आहे. पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्यानंतर मुंबईसारख्या महानगरात जोडून आलेल्या तीन दिवसांच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर कितपत मतदान होईल अशी धाकधूक सर्वच स्तरावर व्यक्त झाली होती, परंतु मुंबई व आसपासच्या परिसरातील मतदारांनी अंगाची लाही लाही करणार्‍या उन्हाचीही पर्वा न करता मोठमोठ्या रांगा लावून उत्साहात मतदान केले आणि निवडणूक प्रक्रियेवरचा दृढ विश्वास ठामपणे व्यक्त केला. समाजमाध्यमांवर झळकलेल्या बोटावरील शाईची खूण मिरवणार्‍या सेल्फीपासून मतदान केंद्रांबाहेरील रांगांपर्यंत लोकांचा उत्साह दिवसभर ओसंडून वाहत होता. पहिल्यांदाच मतदान करणार्‍यांत हा उत्साह जितका दिसून येत होता, तितकाच तो पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने मतदान करीत आलेल्या नव्वदीच्या घरातल्या आजी-आजोबा मंडळींमध्येही दिसून आला. काही ठिकाणी आढळून आलेला मतदान यंत्रांतील बिघाडही या उत्साहावर कोणताही परिणाम करू शकला नाही. व्हीव्हीपॅटची मतपावती बाहेर येण्यास काही सेकंदांचा वेळ लागतो. त्यामुळे काही ठिकाणी मतदानाचा वेग नेहमीपेक्षा काहीसा धीमा होता. परिणामी रांगांची लांबी वाढत होती, पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही व सर्वदूर अत्यंत शांततेत मतदान पार पडले. हे सारे कशाचे निदर्शक आहे? मुंबईत मतदानाची टक्केवारी ही 2014च्या तुलनेत 2.30 टक्क्यांनी वाढल्याचे दिसले. नजीकच्या ठाणे, कल्याण, भिवंडी व पालघर मतदारसंघांतही मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मुंबईतील 55.11 टक्के मतदान हे 1991नंतरचे सर्वाधिक मतदान ठरले. 1991पासून मुंबापुरीतील मतदानाची टक्केवारी सातत्याने चाळीसच्याच घरात राहिली होती. अपवाद फक्त 1998चा. त्यावर्षी या टक्केवारीने

50.4चा आकडा गाठला होता. 2009मध्ये अवघे 41.4 टक्के झालेले मतदान 2014च्या मोदी लाटेत थेट 51.6 टक्क्यांवर जाऊन पोहचले होते. त्यामुळेच आताच्या भरघोस मतदानाकडे पाहून या शहरी मतदारांचा कौल निश्चितपणे मोदींच्याच बाजूने असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. अर्थात विरोधकांना त्यात सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील कौल दिसत आहे. नेमके चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार असले तरी शहरी भागातील मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमागील समाजमाध्यमांचे योगदान मात्र कुणीही नाकारत नाही. समाजमाध्यमांच्या अफाट प्रभावाच्या या युगात ‘मतदान न करणे’ हे मागासपणाचे लक्षण ठरत आहे व त्यामुळेच आपण आपले नागरी कर्तव्य बजावल्याची खूण ‘बोटावरील शाई’च्या रूपाने सर्वच नेटकर्‍यांनी काल दिवसभर दिमाखाने मिरवली. समाजमाध्यमांबरोबरच स्वत: निवडणूक आयोगाने सातत्याने राबवलेली मतदार जागरूकता मोहीम, अन्य काही सामाजिक संस्थांचे प्रयत्न हेही या वाढलेल्या टक्केवारीमागे आहेत. महिला मतदारांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करणार्‍या सखी मतदान केंद्रांसारख्या अभिनव योजना असतील, तर मतदानाची आकडेवारी निश्चितपणे वाढतच जाईल.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply