पनवेल : रामप्रहर वृत्त
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे कोकण प्रदेशाध्यक्ष जगदिश गायकवाड यांची तडीपारी रद्द करावी, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केली आहे. जगदिश गायकवाड हे कोकणातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. दरवर्षी जगदिश गायकवाड रिपाइंच्या माध्यमातून विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना आपल्या सर्व समर्थकांसह उपस्थिती दर्शवितात. 20 मार्च रोजी महाड येथील चवदार तळ्याचा शौर्यदिन तसेच 14 एप्रिलला वेगवेगळ्या तालुक्यात व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला उपस्थित राहून आंबेडकरी चळवळ मजबूत करण्याचा प्रयत्न करतात. अशा समाजसेवकाची तडीपारी शासनाने त्वरीत रद्द करावी, अशी मागणी साळुंखे यांनी केली आहे. जागेंद्र कवाडे, राजेंद गवई, कनिष्क कांबळे, चंद्रकांत हंडोरे, मनोज संसारे, दीपक निकाळजे यांच्यासह विविध नेत्यांशी गायकवाड यांची तडीपारी रद्द करण्याबाबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले आहे.