पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वृद्धिंगत करून इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी हव्या त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य तथा भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी केले. ‘रयत’च्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता दहावीच्या मार्च 2022 मधील बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट असणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्तीसाठ नियोजनबद्ध अभ्यास करून आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी परीक्षेपूर्वीच्या उपलब्ध वेळेचे नियोजन करावे व अध्यापकांचे मार्गदर्शन घ्यावे असेही त्यांनी सांगितले. विद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत व शाळा समिती विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना काही समस्या व अडचणी असल्यास त्यांची सोडवणूक व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यासाठ ही उद्बोधन सभा आयोजित करण्यात आली. शिक्षक पालक संघाचे सचिव देवेंद्र म्हात्रे यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत तसेच स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर व विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंतराव देशमुख व वसंतशेठ पाटील, भाऊ भोईर, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य तसेच ‘रयत’चे संचालक प्रमोद कोळी, ‘रयत’चे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, विद्यालयाचे उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक सागर रंधवे यांनी केले.