महाड : प्रतिनिधी
सोने हॉलमार्कचे झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी वाल्या कोळ्याच्या भूमिकेतून बाहेर येऊन वाल्मिकी व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी केले.
संत नरहरी सोनार पुण्यतिथी निमित्त विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजा तर्फे चोचिंदे (ता. महाड) गावामधील श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मंदिरामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शैलेश पालकर बोलत होते. समाजाचे अध्यक्ष दिगंबर नगरकर, सल्लागार सुधीर सागवेकर यांनीही मनोगत व्यक्त केेले.
सकाळी श्रीसंत नरहरी महाराज सोनार यांच्या मुर्तीवर अभिषेक, पुष्पवृष्टी करण्यात आली. महाडचे सिध्दार्थ नगरकर यांनी सपत्नीक पुजाविधी केला.
यानंतर किर्तन आणि हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर पालकर यांच्या हस्ते प्रदीप चिखलकर यांना गोल्ड व्हॅल्यूएशन प्रमाणपत्राचे वितरण केले. समाजातील गुणवंत महिला व विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
समाजाचे सल्लागार लक्ष्मण पोतदार, वसंत नगरकर, प्रदीप नगरकर, कार्याध्यक्षा मंगला नगरकर, महिला सदस्या जयश्री नगरकर यांच्यासह महाड, पोलादपूर, माणगाव, मंडणगड, दापोली, खेड तालुक्यातील विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजाच्या भगिनी आणि बांधव या कार्यक्रमाला उपस्थितीत होते.