Breaking News

बल्लाळेश्वराच्या पालीत वाहतूक कोंडी

नाताळ सुटी व नववर्ष स्वागतासाठी हजारो भाविक, पर्यटक दाखल

पाली : रामप्रहर वृत्त

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दाखल होत आहेत. त्यांची वाहने तसेच इतर अवजड वाहने व डंपर यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी स्थानिकांबरोबरच पर्यटक व भाविक मेटाकुटीला आले आहेत.

पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्यालय आहे. परिणामी तालुक्यातील अनेक लोक येथे कामानिमित्त व विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये येत असतात. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, भाविक, पादचारी व विद्यार्थ्यांची शहरातून वाट काढतांना मोठी गैरसोय होत आहे.

पालीतील बल्लाळेश्वर मंदिर ते ग.बा. वडेर हायस्कूल, मारुती मंदिर चौक ते जुने एसटी स्टँड, गांधी चौक ते बाजारपेठ, कुंभारआळी, बँक ऑफ इंडिया, हटाळेश्वर चौक ते मिनिडोअर स्टँड, एसबीआय बँक ते गांधी चौक अशा अनेक ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होत आहे.

पाली शहरातील रस्त अरूंद आहेत. येथे खाजगी अवजड व लक्झरी वाहनांची नियमीत वर्दळ सुरु असते. डंपर मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. तसेच मोटार नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालकदेखील वाहतूक कोंडीत भर घालतात. पालीतील अरुंद रस्त्यांच्या दुतर्फा अनेकजण आपली दुचाकी व मोठी वाहने उभी करतात व खरेदी किंवा इतर कामासाठी जातात. अनेक दुकाने, टपर्‍या व इमारती रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. याबरोबरच रस्त्याच्या बाजुला सुरु असलेली बांधकामे आणि या बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडलेले असते यामूळे येथून मार्ग काढणे वाहनचालकांना शक्य होत नाही. सुट्टयांच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक पालीत दाखल होत आहेत. या वाहनांमुळे पालीतील वाहतुकीवर प्रचंड ताण येवून अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध नाक्यांवर पोलीस तैनात असतात. वाहन चालकांनी नियमांचे पालन केल्यास वाहतूक सुरळीत होईल. रात्रीच्या वेळी रहदारी नसतांना डम्पर वाहतूक करण्याची व्यवस्था करण्यात येईल.

-अजित साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाली, ता. सुधागड

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व अवजड वाहतूक नियंत्रित करण्यासाठी योग्य उपयोजना केली जाईल.

-दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply