Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रात 70 टक्के पोलिओ लसीकरण

चार दिवस सुरू राहणार मोहीम

पनवेल : प्रतिनिधी

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेमध्ये महापालिका हद्दीत रविवारी 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात आले  आयुक्त  गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने पोलिओ  लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केल्याने पल्स पोलिओचे 70 टक्के लसीकरण करण्यात यश आले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमे अंतर्गत 0 ते 5 वयोगटातील  67 हजार 222 बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवून मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. यातील 47 हजार 140 बालकांचे लसीकरण या वेळी करण्यात आले. त्याकरिता सहा नागरी आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात 328 स्थायी, 24 ट्रान्झिट व 41 फिरते मोबाईल असे एकूण 393  पोलिओ लसीकरण बूथ कार्यरत होते.

या लसीकरण मोहिमेसाठी रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड अशा ठिकाणी ट्रान्झिट व मोबाइल पथके तयार करण्यात आली होती. तसेच वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. कोविड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून योग्य पध्दतीने लसीकरण करण्याचे निर्देश सर्वांना देण्यात आले होते.

पुढील चार दिवस पोलिओ लसीकरण

वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि आरसीएच अधिकारी डॉ. रेहाना मुजावर यांनी या लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन केले होते. पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत राहिलेल्या वंचित बालकांना महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने पुढील चार दिवस पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे.

Check Also

सिडकोच्या अभय योजनेस 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामी …

Leave a Reply