Breaking News

देशद्रोही मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवा – आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल :  प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमध्ये नवाबाचा मुखवटा घेऊन वावरणारा मलिक नावाचा मंत्री प्रत्यक्षात मात्र कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहिमचा गुलाम असल्याचे ईडीच्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे. असे असतानाही संपूर्ण ठाकरे सरकार या मंत्र्याच्या सरबराईसाठी जीव तोडून सज्ज झाले आहे. कुख्यात डॉन दाऊदच्या हस्तकाची पाठराखण करणारे ठाकरे सरकार त्याच्या हातचे बाहुले बनून महाराष्ट्राच्या जनतेच्या जिवाशी खेळत आहे. सत्तेच्या सुरक्षेसाठी जनतेच्या सुरक्षेला मूठमाती देण्याचा खेळ या सरकारने ताबडतोब थांबवावा आणि दाऊदचा हस्तक नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून महाराष्ट्र वाचवावा, अशी जोरदार मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 1) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या  पत्रकार परिषदेस तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार हेही उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मिरविणार्‍या नवाब मलिक यांचा खरा चेहरा आता ईडीच्या कारवाईनंतर समोर येऊ लागला असून तपासानंतर आणखीही अनेक कारवाया उजेडात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देश अस्थिर करण्यासाठीच दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट घडविले होते. या कटाच्या अंमलबजावणीकरिता स्थानिक पातळीवर पैसा उभा करण्याच्या योजनेचाच एक भाग म्हणून बेनामी मालमत्ता मातीमोल भावाने विकत घेऊन मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करण्याचे षडयंत्र आता उघडकीस येऊ लागले आहे. नवाब मलिकने केलेला व्यवहार हा त्या षडयंत्राचाच एक भाग होता हे ईडीच्या आरोपावरून स्पष्ट होत असून पुढील तपासात आणखीही काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. असे असतानाही नवाब मलिक याचे मंत्रिपद वाचविण्यासाठी खुद्द शरद पवारच ठाकरे सरकारवर दबाव आणत असून मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे या दबावापुढे झुकून दाऊदच्या या हस्तकास संरक्षण देत आहेत, असा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला. संपूर्ण ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सुरक्षिततेस धोका ठरणार्‍या नवाब मलिकची केवळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे पुरेसे नाही, तर या कामी ईडीकडून केल्या जाणार्‍या तपासातही ठाकरे सरकारने संपूर्ण सहकार्य केले पाहिजे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
नवाब मलिकला वाचविण्याकरिता आणि सत्ता टिकविण्याकरिता आपण महाराष्ट्राचा अपमान करीत असून देशद्रोह्याची तरफदारी करीत आहोत याची ठाकरे सरकारला जाणीव नसावी हे दुर्दैवी आहे. आघाडी सरकारच्या या लाळघोटेपणामुळेच महाराष्ट्राची नामुष्की होत असून मुख्यमंत्री ठाकरे यांच्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कणाहीन नाही हे दाखविण्यासाठी भाजपतर्फे तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. नवाब मलिक यांची हकालपट्टी आणि कठोर कारवाई करून दहशतवादास हातभार लावणार्‍या देशद्रोह्याच्या पाठीराख्यांची महाराष्ट्र गय करणार नाही, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला. दाऊदच्या गुलामाचे गुलाम होण्याएवजी जनतेच्या मनातील नवाब व्हा, असा उपरोधिक सल्ला त्यांनी या वेळी ठाकरे सरकारला दिला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply