Breaking News

आमदार महेश बालदी यांचे काम मोठे, 40 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण ः प्रतिनिधी
आमदार महेश बालदी यांचे काम फार मोठे आहे. त्यांच्यासारखा आमदार उरणला लाभला ही भाग्याची गोष्ट आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत त्यांचे वजन आहे. शेकापच्या पुढार्‍यांनी निवडणूक लढविणार्‍यांना मामा बनवून विधानसभा रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी हे 40 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. ते महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 9) उलवे नोड येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
उरणमध्ये विकासाची गंगा आमदार महेश बालदी यांनी आणली. प्रचंड विकासकामे आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी उरण, पनवेल मतदारसंघात केली आहेत. जात, पात, धर्म बाजूला ठेवून आपण काम केले पाहिजे. तरीही उपरा इकडून आला, तिकडून आला म्हणणार्‍यांना लाज कशी वाटत नाही, असा हल्लाबोल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विरोधकांवर केला.
या वेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांनी विरोधकांवर आपल्या खास शैलीत निशाणा साधला. मतदारसंघात सहा हजार कोटी रुपयांची विकासकामे केली. म्हणूनच केलेल्या कामांची पुस्तके छापलीत. विरोधकांनी काय विकास केलाय? ते फक्त टीका-टिपण्णी करतात. मी कधीच जाती-धर्माचा अवमान केला नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. मोर्चे काढा, आणखी काय करा. चुकलो असेल तर शंभर वेळा काय हजारदा माफी मागेन, मात्र चुकलो नाही तर कोणालाही घाबरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपली स्पर्धा समाजाच्या उन्नतीसाठी असली पाहिजे. झेंडा नव्हता, नेता नव्हता तरी जिंकलो. आता तर संपूर्ण पक्ष आणि महायुतीचे शिलेदार माझ्यासोबत आहेत. आगरी, कोळी, कराडी सर्व समाजाची माणसे मला निवडून देतात. यंदा तर 25 हजार मते लाडक्या बहिणीच देणार आहेत, असेही ते म्हणाले.
करंजा बंदरातून कोट्यवधी रुपयांची मासळी निर्यात केली जाते. त्याचा फायदा येथील मच्छिमारांना मिळत आहे. इर्शाळवाडीतील आदिवासी बंधू-भगिनींना घरे देण्याचे कार्य आपल्या सरकारने केले. बाकी राहिलेल्या आदिवासींनाही पक्की घरे देणार असून यापुढे आदिवासी कुडाच्या घरात राहणार नाही, असे सांगून आमदार महेश बालदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, येथील लोकांच्या सुरक्षेसाठी उलवे नोड पोलीस ठाणे सुरू केले. आता येथील खंडणीची दुकाने बंद करणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट करून आपल्याला राज्य पुढे न्यायचे आहे. आपण विकासावर बोलतो. त्यामुळे विरोधकांना टीकेसाठी मुद्दा शिल्लक नाही. यंदाचे विकास पुस्तक सहा हजार कोटींच्या कामांचे आहे. पुढील पुस्तक 10 हजार कोटींच्या कामांचे असेल.
सत्तेत असताना ज्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याऐवजी स्वतःच्या वडिलांचे नाव देण्याचा घाट घातला होता त्या उबाठा सेनेने भाजप ‘दिबां’च्या नावाविरुद्ध असल्याचा कांगावा करणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. शिवाय या विमानतळाला अदानींचे नाव दिले असल्याचा खोटा प्रचार उबाठा सेना व महाविकास आघाडी करीत असून त्यातून जनतेत गैरसमज पसरवले जात आहेत, परंतु ‘दिबां’चे नाव विमानतळाला देण्यासाठी भाजपच नेहमी आग्रही राहिला असून त्यासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया भाजप सरकारने पूर्ण केली आहे. लवकरच हे विमानतळ लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावाने ओळखले जाईल, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असल्याचे ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. इतर मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली.
या सभेला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, रूपेश पाटील, मनोज घरत, महिला जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळुंखे, शहर प्रमुख सोनल घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजनाथ ठाकूर, भाजप जिल्हा चिटणीस रूपेश धुमाळ, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष एस.के. नाईक, माजी जि.प. सदस्य विजय भोईर, गव्हाणचे माजी उपसरपंच विजय घरत, वहाळचे माजी उपसरपंच अमर म्हात्रे, मंगेश वाकडीकर, महेश कडू, भार्गव ठाकूर, निलेश खारकर, वितेश म्हात्रे, धीरज ओवळेकर, राकेश गायकवाड, योगिता भगत, मंजुळा कोळी, पंडितशेठ म्हात्रे, निकीता खारकर, सुभाष म्हात्रे, गजानन पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, बळीराम घरत, गोपीशेठ म्हात्रे, प्रतिक मोरे, नार्सी खान, आर्देयोगी शुक्ला, मदन पाटील, अवदेश महतो, कृष्णा सागरेवन, मासानम मोणार, रोहित शर्मा, अ‍ॅड. सनिल मोर्या, कैलाश मिश्रा, डॉ. भरून कुमार, कैलास गोंधळी, अंकुश ठाकूर, सी.एल. ठाकूर, मेघाताई दमडे, किशोर पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेत उलवे नोडसह उरण मतदारसंघातील विविध ठिकाणच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. या सभेचे औचित्य साधून भाजप युवा मोर्चा पळस्पे पंचायत समितीच्या उपाध्यक्षपदी आदित्य बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply