पनवेल : रामप्रहर वृत्त
नोबेल पारितोषिक विजेते प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जयंतीदिनी रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.पनवेल तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते चंद्रकांत सर्वगोड व अनंत बाविस्कर यांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे वैज्ञानिक सत्यता विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविली.
समाजात भोंदूगिरीचे वाढते प्रस्थ आणि जादुटोणा, भानामती, भूतबाधा आदि अनिष्ट रूढींच्या विळख्यात खितपत पडलेल्या अंधश्रद्ध समाजाला बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारांच्या पाठीमागे असणारे वैज्ञानिक सत्य सांगत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक व्हावी या दृष्टीने विशेष मार्गदर्शन केले.
या वेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर यांनी प्रास्ताविकपर भाषणात थोर वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमण यांच्या ’रमण इफेक्टस्’ या महत्त्वपूर्ण शोधाची माहिती देऊन राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व विषद केले.
या कार्यक्रमास विद्यालयातील विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख विज्ञान शिक्षक संदीप भोईर, द्रौपदी वर्तक, ज्योती माळी, वृषाली म्हात्रे, प्रसन्न ठाकूर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले तर उपशिक्षक प्रसन्न ठाकूर यांनी आभार मानले.