अलिबाग : प्रतिनिधी
एकीकडे वाढता अंग पोळून काढणारे ऊन तर दुसरीकडे वाढती पाणीटंचाई असा दुहेरी त्रास सध्या रायगडकर सहन करीत आहे. उकाड्या सोबत पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यातील जनतेला सोसाव्या लागत आहेत.
रायगडात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडत असला तरी एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विहिरी, बोअरवेलचे पाणी तळ गाठते. नदी, धरणातील पाणीसुद्धा कमी होते. त्यामुळे ‘नेहमीची येतो पावसाळा‘ तसे दरवर्षीची पाणीटंचाई सुरू होते. डोंगर भागात पडणारा पाऊस आणि समुद्र किनार्यालगतच्या गावांमध्ये पडणार पाऊस याचे नियोजन नसल्याने पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. अशी ओरड वर्षानुवर्षे केली जाते पण त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यांत सर्वाना पाण्यासाठी प्रतीक्षा आणि भटकंती करावी लागते.
अलिबागसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावकरी पाणीटंचाईच्या झळा सहन करीत आहेत. योजनांची पाणी कपात आणि स्थानिक पाण्याचे स्त्रोत आटल्याने टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस, बोडणी या शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचत नाही.
नियमित पाणी सोडले जात नाही. कधी आठ दिवसांनी तर कधी 20 दिवसांनी एमआयडीसीच्या योजनेचे पाणी गावकर्यांना मिळते. उर्वरित दिवस विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.