
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
बाहेरच्या देशातून आलेल्या पाच नागरिकांना कर्जत येथील निगराणी कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रायगड जिल्हा प्रशासनाने गंभीर आणि खबरदारीची पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार यांच्यासह अन्य यंत्रणांच्या प्रमुख अधिकार्यांची जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा, तालुका, पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे, याचाच भाग म्हणून कर्जत तालुक्यात दुबई व मलेशियातून आलेल्या प्रत्यकी दोन आणि युकेमधून आलेल्या एका परदेशी नागरिकाला खबरदारी म्हणून कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील निगराणी कक्षात ठेवण्यात आले आहे, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत मात्र ते परदेशातून आले आहेत म्हणून त्यांना 14 दिवस डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार असल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संक्रमण नियंत्रण कक्ष
कर्जत पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने करोना संक्रमण उपाय योजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय करोना संक्रमण नियंत्रण कक्ष उघडण्यात आली आहेत. त्यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे काम पाहत आहेत. तसेच कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल, नेरळ येथील सन्मान लॉज, वामन राव पै रामवाडी येथील जीवन विद्या मिशन, कळंबोली येथील रिवर गेट रिसॉर्ट, खांडपे येथील रेडिसन ब्ल्यू, वांजळे येथील डॉ. मोदी रिसॉर्ट, कळंब येथील दि रिच रिसॉर्ट, वारे कुरुंग रोड येथील फार्म लाईफ, मार्गाची वाडी येथील भीमाशंकर हिल आणि कोंठिबे येथील हरी ओम मठ अशा 11 ठिकाणी र्र्(िीींरपींर्ळींश लशश्रश्र) करोना संक्रमण उपायोजना नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका प्रशासनाने दिली आहे.
पंचायत समिती सतर्क
कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या सर्व 51 ग्रामपंचायतींना सतर्क केले आहे. सर्व सरपंच आणि ग्रामसेवक यांची बैठक गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांनी घेतली आहे. सर्व ग्रामसेवक यांना कोरोनापासून आपले गाव कसे दूर राहतील यासाठी परिसर स्वच्छता तत्काळ करून घेण्याचा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी ग्रामपंचायत हद्दीत परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती तात्काळ आपल्या वरिष्ठ कार्यालयाला कळवावी, असे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper