Breaking News

शेअर बाजारात आता कोणती रणनीती चालणार?

अनेक फंड मॅनेजर आणि गुंतवणूकदारांना महागाईचा बाजार दिसत नसल्याने येणारा दिवस आव्हानाचा असणार आहे. तर, अशा परिस्थितीत आपली दिशा काय असली पाहिजे? त्याचेउत्कृष्ट उत्तर: रिअल इस्टेट, सोने, धातू आणि ऊर्जा साठा या क्षेत्रातील कंपन्या खरेदी करा. अर्थात, या थीम आधीच चालू झाल्या आहेत. मग आता रणनीती काय असावी?

मागील आठवड्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांच्या विलीनीकरणाची बातमी बाजारात आल्यावर दोन्ही कंपन्यांच्या शेअरकिमतींनी उसळी मारली. 13 मार्च रोजी 1345 रुपयांवर माझ्या क्लायंट्सना एचडीएफसी बँकेचे शेअर्स खरेदी करण्याबाबत माहिती दिली होती आणि 4 एप्रिल रोजी या शेअर्सनी 1722 हा उच्चांक नोंदवला (28% वाढ). परंतु एकाच आठवड्यात हाच शेअर पुन्हा 1500 रुपयांवर तर एचडीएफसीचा शेअरभाव 2933 वरून पुन्हा 2428 रुपयांवर आलेला होता. आता सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे एवढी वाढ अगदी कमी कालावधीमध्ये नोंदवल्यावर आहेत ते शेअर्स विकून नफा मिळवावा की दीर्घ मुदतीसाठी असे शेअर्स सांभाळून ठेवावेत?

याचं उत्तर प्रत्येकाच्या जीवनशैलीनुसार बदलत जातं. जर गुंतवणूक ही ट्रेडिंग स्टाईलनं केलेली असेल तर आपल्या लावलेल्या भांडवलावर वर्षाकाठी 40% नफा गृहीत धरल्यास (यापेक्षा जास्त म्हणजे रोज एक टक्का किंवा महिन्याला 10% म्हणजे सट्टा खेळण्यासारखं आहे) फायदा पदरात पडून घेणं कधीही हितावहच. आणि अशी गुंतवणूक वेल्थ क्रिएशन म्हणून केलेली असल्यास लघुत्तम नफ्याकडं दुर्लक्ष करून संपत्ती जमवणं हाच उद्देश ठेवणं योग्य.

आता (कमावलेली) संपत्ती म्हणजे वेल्थ असं गृहीत धरल्यास त्यात त्या मालकाच्या बाजूनं अनेक पैलू येतात. ज्या गोष्टींना सर्वसामान्य लोक ’खर्च’ असं संबोधतात अशा अनेक गोष्टींना कांही लोक ’गुंतवणूक’ संबोधत असतात, त्यामुळं प्रत्येक व्यक्तीगणिक या गोष्टींची व्याख्या बदलल्यानं त्यासंबंधित गोष्टींची रूपरेषा सुद्धा बदलली जाते आणि त्यामुळं खर्च व गुंतवणुकीची गणितं देखील खूप बदलतात. एका संपत्तीवान गृहस्थांशी बोलताना लक्षात आलं की त्यांच्या घरात असलेली विविध महागडी तैलचित्रं / पेंटिंग्स हा देखील त्यांच्या संपत्तीचा हिस्सा आहे. काहींना जुन्या गाड्या जपण्यामध्ये स्वारस्य असतं आणि जरी अशा गाड्यांमध्ये केली गेलेली गुंतवणूक कोणताच परतावा (यील्ड) देत नसली तरी अशी गुंतवणूक (खर्च) हा जणू त्यांच्या जीवनशैलीचाच एक भाग बनून जातो. एक महाशय असे आहेत, जे स्वतः कधीच मद्य घेत नाहीत परंतु महागडे असे विविध मद्यप्रकार निरनिराळ्या आकाराच्या बाटल्यांमधून संग्रहित करणं हा त्यांचा छंद बनून गेलाय आणि त्यासाठी खर्च करणं त्यांना काही वावगं वाटत नाही आणि अशांच्या दृष्टीनं ती एक गुंतवणूकच असते. शेवटी, ‘शौक बडी चीज हैं’ हे देखील खरंय. हे लोक आपल्या मिळकतीचा अथवा संपत्तीचा एक हिस्सा अशा गोष्टींमध्ये गुंतवतात,  ज्यांमधून आर्थिकदृष्ट्या काहीही फायदा नसतो.. तरी संपत्ती व्यवस्थापन करताना या गोष्टी ग्राह्य धराव्या लागतात कारण इथं जरी केलेल्या गुंतवणुकीची भांडवल वृद्धी गृहीत धरता येत नसली तरी त्या मनुष्याचं समाजातील स्थान, त्याची इभ्रत, स्थान यांचं मूल्यन करून देत असतात  आणि अशा लोकांचामोठेपणा हा अशा गोष्टींवरूनच ठरत असतो.

यावरून एक प्रसंग सांगितला जातो.एका माणसानं स्विस बनावटीचं अत्यंत महागडं लाखो रुपये किंमतीचं असं घड्याळ घातलेलं असतं आणि त्याला खिजवण्याच्या उद्देशानं एक जण त्याला विचारतो की, तुमचं घड्याळ लाखो रुपयांचं तर माझं घड्याळ केवळ काही शे रुपयांचं आहे, तरीही दोन्ही घड्याळं वेळ मात्र एकच दाखवतात ! यावर तो पहिला मनुष्य उत्तरतो,  दोघांच्या किंवा सगळ्यांच्या घड्याळातील दिसणारी वेळ जरी सारखीच असली तरी माझं घड्याळ माझी वेळ कशी (चांगली) आहे हे दर्शवतं.. हा झाला संपत्ती व्यवस्थानातील एक पैलू.

दुसरा पैलू किंवा संपत्ती व्यवस्थानाचा हेतू म्हणजे, संपत्ती व्यवस्थापनात असलेली संपत्ती वृद्धिंगत होण्यावर जास्त भर न देता तिचा र्‍हास न होऊ देता (इरोझन) ती टिकवून ठेवण्यास जास्त महत्व येतं. यामध्ये भांडवलवृद्धी (कॅपिटल ऍप्रिसिएशन) आणि भांडवल संस्करण (कॅपिटल प्रिझर्व्हेशन) ह्या दोन मूलभूत गोष्टी येतात. Capital preservation is more important than capital appreciation. या दोन्ही गोष्टी तरुणांनाशिकण्यावर मी विशेष भर देत असतो.

भांडवल संस्करण ही एक पुराणमतवादी गुंतवणूकीची रणनीती आहे जिथं भांडवल म्हणजेच मूळ गुंतवणुकीचा र्‍हास होऊ न देणं व पोर्टफोलिओमधील तोटा टाळणं हेच प्राथमिक लक्ष्य असू शकतं. भांडवल संस्करणासाठी वापरल्या जाणार्‍या पर्यायात जोखीम कमी असते. सेवानिवृत्त लोकांसाठी भांडवल संस्करण ही अत्यंत महत्वाची बाब असू शकते कारण त्यांचा घरखर्च भागविण्यासाठीच्या उत्पन्नाचा स्रोत म्हणजे त्यांच्या जवळ असलेली रक्कम. परंतु गुंतवणूक अत्यंत सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांत एक धोका राहू शकतो तो म्हणजे दीर्घ कालावधीसाठी सुरक्षित गुंतवणूकीमधून मिळणारा परताव्याचा दर व वाढत्या महागाईचा दर आणि त्यामुळं गुंतवणुकीद्वारे मिळणारं नियमीत स्थिर उत्पन्न व महागाईच्या दरानुसार वाढत जाणारा घरखर्च. अल्प कालावधीत चलनवाढीचा परताव्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होणार नसला तरी कालांतराने ते गुंतवणूकीचं वास्तविक मूल्य कमी करू शकतं आणि हाच धोका ओळखून सुरक्षित व अन्य योग्य अशा पर्यायात गुंतवणूक करून, एकूणच गुंतवणूक संस्करण व प्रमाणात भांडवल वृद्धी यांचा योग्य समन्वय साधून गुंतवणूकदाराच्या जीवनाच्या शेवटापर्यंत ती गुंतवणूक आपल्या नियमित उत्पन्नाचा स्रोत ठरेल हेच उद्दिष्ट ठेवणं उचित.

भांडवल वृद्धी : खरेदी केलेल्या मालमत्तेच्या बाजारभावातील फरकानं मिळवलेला नफा म्हणजेच भांडवल वृद्धी. शेअर्स, म्युच्युअल फंड्स, सोनं-चांदी, स्थावर मालमत्ता इ. गोष्टींची खरेदी किंमत आणि कालांतरानं त्यांच्या वाढलेल्या बाजारभावामुळं वाढलेलं मूल्य, म्हणजे त्या त्या प्रकारातील भांडवल वृद्धी. मालमत्तेचं मूल्य हे अनेक कारणांनी वाढू शकतं. भांडवली आर्थिक वाढ किंवा रिझर्व्ह बँक पॉलिसी, मॅक्रोइकॉनॉमिक्स घटक किंवा कर्जाच्या वाढीस उत्तेजन देणारी, अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा ओघ आणणारी धोरणं, यांसह मालमत्ता मूल्यांमध्ये वाढ होण्याचा सामान्य कल असू शकतो. तथापि, भांडवल वृद्धी केवळ गुंतवणूकीमधून उत्पन्नाचा स्रोत ठरू शकत नाही तर त्याखेरीज विविध गुंतवणूक पर्यायांमधून मिळणारं व्याजाचं उत्पन्न, शेअर्स अथवा म्युच्युअल फंड्सवर मिळणारे लाभांश आणि स्थावर मालमत्तेवर मिळणारं भाडं हे देखील गुंतवणूकदारांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. भांडवलवृद्धीच्या दृष्टीनं लक्ष्य केलेल्या गुंतवणूकीत (ग्रोथ स्टॉक्स, इक्विटी म्युच्युअल फंड्स, सोनं, स्थावर मालमत्ता, इ.) भांडवल संस्करणासाठी किंवा उत्पन्नाचा स्रोत म्हणून निवडलेल्या ऍसेटपेक्षा (व्हॅल्यू स्टॉक्स, सरकारी बाँड, म्युनिसिपल बॉन्ड्स किंवा लाभांश देणार्‍या कंपन्यांचे शेअर्स, फिक्स्ड डिपॉझिट्स, इ.) अधिक जोखीम असते.

सध्या वेल्थ प्रिझर्वेशनसाठी एक उत्तम पर्याय बाजारात आलेला आहे ज्यासाठी 9.7% प्रतिवर्ष परतावा आहे. मुदतठेवीपेक्षा हा पर्याय जोखीम कमी करत असून परतावा देखील जास्त देत असतो.

सुपरशेअर : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज

हर्षद मेहताच्या काळात म्हणजेच 1992 मध्ये एक टॅक्स पेयिंग कंपनी म्हणून नोंद झालेली नॅशनल स्टॉक एक्स्चेंज 1993 मध्ये एक एक्सचेंज म्हणून ओळखली जाऊ लागली. शेअर्सच्या रोजच्या भावाची माहिती जी पूर्वी फक्त मोजक्या लोकांद्वारे मिळत असे ती आता प्रत्येकास अगदी दूरस्थ ठिकाणी देखील त्याच सहजतेने उपलब्ध होऊ लागली. कागदावर आधारित सेटलमेंटची जागा इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी-आधारित खात्यांनी घेतली आणि व्यवहारांचे सेटलमेंट नेहमी वेळेवर होऊ लागले. 1994 मध्ये होलसेल डेट मार्केट मध्ये व्यवहार करणारं एक्सचेंज 2000 साली डेरिव्हेटीव्ह प्रकारात उदयास आलं. फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन (ऋखअ) या डेरिव्हेटिव्हज व्यापार संस्थेनं केलेल्या पाहणीनुसार व्यवहारांच्या संख्येच्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये छडए हे जगातील सर्वात मोठं डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज ठरलेलं आहे, एक्सचेंजनं हा किताब सलग तिसरे वर्ष राखलेला असून तर इक्विटी प्रकारात ते जगात चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या या एक्सचेंजवर शेअर्स, डेरीव्हेटीव्ह्ज, करन्सी व कमॉडिटी डेरीव्हेटीव्ह्ज आणि इंटरेस्ट रेट फ्युचर्स यांचे व्यवहार होत आहेत. 31 डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीनं 2489.62 कोटींचे उत्पन्न जाहीर केलेलं असून 1795.56 कोटी करपूर्व नफा आहे. या कंपनीचा एकमेव प्रतिस्पर्धी बाँबे स्टॉक एक्सचेंज असून ही कंपनी शेअरबाजारात नोंदणीकृत आहे. खालील चौकटीत दोन्हींमधील तफावत कळून येऊ शकते. या छडए चे शेअर्स खास लोकांमार्फत अनेक सोपस्कार पार पडून वाजवी किंमतीत मिळवता येऊ शकतात.

-प्रसाद भावे, अर्थप्रहर

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply