बाधित शेतकर्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
उरण ः वार्ताहर
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील द्रोणागिरी धरण तलाव क्र.2 वर शेतजमिनीच्या सुरक्षितेसाठी असलेले साकव वरून बेकायदेशीररित्या जडवाहतूक सुरु आहे. येथे जड वाहनांना बंदी असूनही जड वाहनांची वाहतूक नेहमी सुरु असल्याने ही जड वाहतूक थांबवून हाईट गेज पूर्ववत करून साकवाचे अस्तित्व अबाधित ठेवावेत अन्यथा चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाधित शेतकर्यांनी प्रशासनाला दिला आहे.
अधिक वृत्त असे, शेत जमीन सुरक्षितेसाठी सिडकोने मौजे-चाणजे, ता. उरण येथील शेतकर्यांच्या जमिनी संपादन न करता शेतकर्यांच्या सर्व्हे न.418,422,423 या जमिनीवर साकव बांधले. साकवाच्या सुरक्षितेसाठी साकवावरून जडवाहतूक न होण्यासाठी हाईट गेज लावण्यात आले होते. परंतु महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, सिडको कार्यालय यांच्याकडून करंजा टर्मिनल कंपनीस फक्त 2016 चा पावसाळा होईपर्यंत हाईट गेज काढून 25 टन पर्यंत वजनाच्या वाहतुकीस पत्राद्वारे परवानगी देण्यात आली होती. परंतु आत्तापर्यंत हाईट गेज लावण्यात आलेले नाही. परिणामी करंजा टर्मिनल कडून जडवाहतूक बेकायदेशीररित्या होत आहे. त्यामुळे संबंधित साकवाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. चाणजे शेतकरी संघर्ष समिती कडून संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार करून देखील या गंभीर विषयाची दखल घेण्यात आलेली नाही परिणामी संघटनेकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली. तसेच साकवावरून बेकायदेशीररित्या मोठी जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे साकवाचे अस्तित्व व शेतजमिनीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. 250 एकर शेत जमिनीचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ताबडतोब बेकायदेशीररीत्या चाललेली जडवाहतूक थांबवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून हाईट गेज पूर्ववत करण्यात यावे, अन्यथा बाधित शेतकर्यांद्वारे तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणार्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असा इशारा बाधित शेतकर्यांच्या वतीने चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिला आहे. दरम्यान येत्या 15 दिवसाच्या आत प्रश्न सुटला नाही तर चाणजे शेतकरी संघर्ष समिती तर्फे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असाही इशारा देण्यात आला आहे.