संगणक परिचालकांचे ठिय्या आंदोलन
अलिबाग : प्रतिनिधी
संगणक परिचालकांच्या मानधनाबाबत लावण्यात आलेली इन्व्हाईस क्लेमची अट रद्द करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्या संगणक परिचालकांनी बुधवारी (दि. 13) रायगड जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रमध्ये काम करणार्या संगणक परिचालकांना सीएसी-एसपीव्ही या कंपनीकडून तीन महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. मानधनासाठी दर महिन्याला जो इन्व्हाईस क्लेम करावा लागतो त्यासाठी कंपनीकडून जाचक अट लावली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांना हक्काच्या मानधनाला मुकावे लागणार आहे. ही अट काढण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी संगणक परिचालकांनी रायगड जिल्हा परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. ग्रामपंचायतीमधील 1-33 नमुन्यामध्ये किती एन्ट्री आहेत, त्याची ऑनलाईन नोंद केल्याशिवाय संगणक परिचालकांना इन्व्हाईस क्लेम करता येणार नाही. ग्रामपंचायतीमधील 1-33 नमुन्यामध्ये असलेल्या एन्ट्रीची नोंद करायला संघटनेचा विरोध नसून त्यासाठी सर्व संगणक परिचालक तयार आहेत. परंतु जोपर्यंत त्याचे आकडे ग्रामपंचायतीकडून प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत त्याची एन्ट्री करता येत नाही. त्यामुळे इन्व्हाईस करता येणार नाही. परिणामी संगणक परिचालकांना आपल्या हक्काच्या मानधनाला मुकावे लागू शकते. या अटीला संघटनेचा विरोध आहे, असे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य सचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयुर गणेश कांबळे यांनी सांगितले.