Breaking News

फणसाड अभयारण्यात पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना

मुरूड : प्रतिनिधी

कडक उन्हाळ्यातसुद्धा वन्यजीवांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी फणसाड अभयारण्य प्रशासनाने विविध उपाय योजना करून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या अभयारण्यात पक्षी व वन्य जीव विशेषत: रानगव्यांची संख्या वाढत आहे.

मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात 90 प्रकारची फुलपाखरे आणि पक्षांच्या 190 प्रजाती आहेत. या अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर,  रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, रानमांजर, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार सुद्धा येथे आहे.

फणसाड अभयारण्यात पाण्याचे 27 नैसर्गिक स्त्रोत आहेत. तरीसुध्दा येथील पक्षी व वन्यजीव यांच्यासाठी कृत्रीम असे 11 बशी आणि 15 वन तलाव तयार करण्यात आले आहेत. या 26 कृत्रीम तलावामध्ये पाणी उपलब्ध होण्यासाठी चार बोअरवेल मारण्यात आल्या आहेत. तसेच अन्य ठिकाणाहून गाडीच्या सहाय्याने पाणी आणले जाते. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा बसत असताना फणसाड अभयारण्यातील पक्षी व वन्यजीवांसाठी मात्र मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

या अभयारण्यात 18 रानगवे असल्याची नोंद करण्यात आली आहे. रानगवा हा भरपूर खाद्य  व मोठ्या प्रमाणात पाणी पिणारा वन्यजीव आहे. या अभयारण्यात मुबलक पाण्याची सोय झाल्याने रानगव्यांची संख्या वाढत असल्याचा दावा फणसाड अभयारण्य प्रशासनाने केला आहे.

या अभयारण्यात बशी तलाव व वन तलाव निर्माण केले आहेत. या कृत्रिम तलावात रोज पाणी टाकले जाते त्यामुळे येथील पक्षी व वन्यजीवांना जवळच पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळेच रान गव्यांची संख्या वाढत आहे.

-राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य, ता. मुरूड

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply