विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पनवेलमध्ये आंदोलन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शिक्षकांना गुरू मानले जाते, मात्र राज्य सरकार शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून गुरूंचा अनादर करीत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड शिक्षक सेलच्या वतीने भाजप
उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. 8) आंदोलन करण्यात आले. ज्ञानदानासाठी आयुष्य खर्च करणार्या शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवणार्या महाविकास आघाडी सरकारचा या वेळी शिक्षकांनी निषेध व्यक्त केला.
कोरोनासंबंधी नियमांचे पालन करून झालेल्या या आंदोलनात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील, सहसंयोजक भूषण जोशी, नगरसेविका दर्शना भोईर, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शिक्षक सेलचे तालुका मंडल संयोजक प्रमोद कोळी, शहर मंडल संयोजक अनंता कोळी, कामोठे संयोजक लक्ष्मण जगताप, लक्ष्मण पाटील, बाबासाहेब ठोंबरे यांच्यासह निवृत्त शिक्षक सहभागी झाले होते.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांचे पगार व पेन्शन वेळेवर द्यावी, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ मिळावा, मेडिकल बिल मिळावे, केंद्र सरकारप्रमाणे डीए तत्काळ देण्यात यावा, शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात, पीएफच्या पावत्या वेळेवर मिळत नाहीत ते वेळेवर द्यावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावे, शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, प्रलंबित वैद्यकीय, चटोपाध्याय, पुरवणी व इतर सर्व प्रकारची देयके तत्काळ निकाली काढावी, तसेच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या दिरंगाई न करता तत्काळ करण्यात याव्यात, अशा मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांच्या सन्मानार्थ भाजप मैदानात, जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, मूल्यांकनप्राप्त शाळांना अनुदान लागू झालेच पाहिजे, पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन शिक्षकांनी आपल्या मागण्यांवर या वेळी जोर दिला.