Breaking News

महाडची पूर समस्या, वीर-रानवडी रेल्वे दुपदरीकरणाचा प्रश्न सोडवणार

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आश्वासन

महाड : प्रतिनिधी

कोकण रेल्वेमार्गावरील वीर ते रानवडी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच दासगाव येथे पूर निवारण यंत्रणा उभारण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन लवकरात लवकर हे प्रश्न सोडविण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवूण दरेकर यांना गुरुवारी (दि. 5) दिले. कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच महाड येथील पूर निवारणाच्या प्रश्नासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या वेळी चर्चा करताना दरेकर यांनी सांगितले की, दासगाव येथे रेल्वेने 60 मी. चा भराव टाकला आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला तर ते पाणी सुमारे 72 तास तिथेच टिकून राहते. जेव्हा ओहोटी येते तेव्हाही पाणी ओसरण्यासाठी मार्ग नाही. ते पाणी ओसरले गेल्यास पूराची तीव्रता कमी होऊ शकते व पूर निवारणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. या वेळी  दरेकर यांनी तेथील जागेचा आराखडा रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दाखविला. ना. दानवे यांनी हा विषय समजून घेतला व संबंधित अधिकर्‍यांना सूचना देऊन बैठक घेण्यास सांगितले. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरीमधील रानवडी ते सांवतवाडी दरम्यान दुहेरी रेल्वे मार्ग आहे. तर रायगडमधील वीर व रत्नागिरीमधील रानवडी दरम्यान एकेरी रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे मुंबईतून सुटणार्‍या रेल्वे गाड्या रानवडी येथे थांबतात तर सांवतवाडी-गोव्याहून येणार्‍या गाड्याही रानवडी येथे एकाच मार्गावर थांबतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे. वीर ते रानवडी दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास येथील वाहतूक सुरळीत होईल. असे दरेकर यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांना सदर जागेची पाहणी करुन त्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या व हा प्रश्न लवकर सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दरेकर यांना दिले. महाड पूर निवारण समितीच्या शिष्टमंडळाने या वेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना निवेदन सादर केले. महाड पूर निवारण समितीचे नितीन पावले, डॉ. समीर बुटाला, संजीव मेहता, रवींद्र वेरणेकर, रायगड भाजपचे बिपीन म्हामुणकर, श्रीमती कुद्रीमोती, संदीप ठोंबरे आदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply