Breaking News

द्रष्टे नेते स्व. जनार्दन भगत

स्व. जनार्दन आत्माराम भगतसाहेब म्हणजे माझे आबा. त्यांच्या 34व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. माझे आबा म्हणजे सुसंस्कारांचा खजिना, मायेचा जिवंत झरा, दीन-दुबळ्यांचे आधारस्तंभ, गोरगरिबांचे कनवाळू. जेव्हा माझे आबा काळाच्या पडद्याआड गेले तेव्हापासून वियोगाची स्पंदने आजही आठवतात. आज त्यांनी मोठी संपती जरी मागे ठेवली नसली तरी आपल्या कर्तृत्वाची शिदोरी आम्हाला दिली आहे. स्वत:चे शिक्षण कमी असूनसुद्धा शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. म्हणून त्यांच्या विचारांतून व तळमळीतून त्यांच्याच नावाच्या शिक्षण संस्थेचा जन्म झाला आणि आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कानाकोपर्‍यात जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेचे नाव सर्वमुखी आहे. मला आठवतेय माझ्या लहानपणी आमचे घर म्हणजे समाजसेवेचे अतिमहत्त्वाचे स्थान बनले होते. तेव्हा लोकांचे शिक्षण कमी असल्यामुळे जमीन-जुमला, एकमेकांचे हेवेदावे, राजकीय गट यामुळे भांडणतंट्यांना परिसीमाच नव्हती. वाद मिटविण्यासाठी लोक आमच्या घरी येत असत, पण माझ्या आबांचे समाजामध्ये असलेले स्थान व आदरयुक्त दरारा लोकांच्या मनात घर करून बसला होता. त्यामुळे गावागावांतील भांडणाला पूर्णविराम मिळण्यासाठी आबांच्या रूपाने शांतीदूताचे महान कार्य घडत होते. ते माझ्या बालमनाला स्पर्श करून जात होते. जगाचे कल्याण संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे आबांच्या पुरोगामी विचारधारेचा प्रभाव लोकांवर पडल्याने गावागावातील भांडणे मिटून शांततेचा संदेश समाजाला मिळत होता. आबांच्या विचारांची पकड समाजावर पडली होती. त्या वेळी समाजामध्ये असणार्‍या वाईट रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आबांकडून प्रयत्न होत होते. त्यातच लग्नसमारंभात हळदी समारंभावर होणार्‍या खर्चावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. देव माणसात शोधा, देवळात नाही हे पटवून देण्यासाठी ते कधीही देवळात गेले नाही. त्यांनी लोकांची सेवा करणे पसंत केले, तसेच देव प्रसन्न होण्यासाठी कधीही उपवास केला नाही. अशा प्रकारे त्यांनी स्वत:च्या कृतीतून आदर्श घालून दिला. एकदा काय झाले, सातार्‍यातून पनवेल परिसरात नव्यानेच आलेला एक जण इथे सर्व दु:खांवर जालीम इलाज करणार्‍या भगताची चौकशी करीत होता. हा भगत आपले जीवन बदलून टाकणार व चमत्कार नक्कीच करणार म्हणून तोे मोठ्या आशेने दूरवरून आला होता. चौकशी करताना त्याची गाठ अखेर त्या भगताशी झाली आणि तो अवाक् झाला. कारण त्याला भेटलेला भगत कोणत्याही अंगार्‍या धुपार्‍याशिवाय आणि गंड्यादोर्‍यांशिवाय शेकडो लोकांची आयुष्ये क्षणार्धात बदलत होता. ईश्वरी कृपेने स्वतःच्या कर्तृत्वाने अशी अफाट क्षमता स्वत:च्या ठायी बाळगणारे ते अद्वितीय आणि असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. जनार्दन आत्माराम भगत अर्थात माझे आबा. आमच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईचे फळ म्हणून मला त्यांचा जैविक, सामाजिक, भौतिक आणि आध्यात्मिक वारसा चालविण्याची संधी मिळाली. त्यांचा मुलगा म्हणूनच नव्हे, तर एक जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक म्हणूनही या गोष्टीची जाणीव मला सतत राहिली आहे. आम्ही लहान होतो तेव्हापासून आबांच्या कामाची पद्धत मी पाहत आलो आहे. सामान्याहूनही अतिसामान्य होण्याच्या त्यांच्या वृत्ती आणि कौशल्यातून त्यांनी एक एक माणूस नुसता जोडलाच नाही, तर जगवला आणि वाढवला देखील. आपल्याकडे असलेली सगळी सत्ता आणि संपदा त्यांनी जास्तीत जास्त सामान्य माणसाच्या कल्याणासाठी वापरली आणि म्हणूनच गोरगरीब जनतेचा ओढा त्यांच्याकडे राहिला. सकाळ-संध्याकाळ आमच्या घराच्या ओट्यावर आम्ही लहानपणापासून पाहिलेली गर्दी हे त्याचेच प्रतीक होते हे आम्हाला आज प्रकर्षाने कळते. आबांनी अनेक आंदोलने केली. दिग्गजांबरोबर तुरुंगवासही भोगला, मात्र त्याचे कधी भांडवल करण्याचा करंटेपणा केला नाही. म्हणूनच आम्ही आज त्या पुण्याईचा झेंडा अभिमानाने मिरवू शकतो. कोणता गुण त्यांच्यात नव्हता? अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, आदर्श शेतकरी, सुसंस्कृत माणूस, निडर आंदोलक, हाडाचा समाजसेवी आणि एक आदर्श पिता व पतीदेखील. आजच्या जगातील विविध वृत्ती आणि प्रवृत्तीचे संकुचित आणि स्वकेंद्रित लोक दिसले की त्यांचे हे विविधांगी व्यक्तिमत्त्व अधिकच ठळक होते. समाजाचा विचार करणे वेगळे आणि त्यासाठी त्या विचारांना प्रत्यक्षात आणणे वेगळे. आबांनी या दोन्ही गोष्टी केल्या. अंधश्रद्धा निर्मूलनाचे भाषण देणे वेगळे आणि ते विचार, तो द़ृष्टिकोन जगणे वेगळे. आबांनी या सर्व गोष्टी अमलात आणल्या. हटकून प्रसंगी एकादशीलाही मांसाहार करण्यामागची वैचारिक बैठक समजणं सामान्य माणसाच्या आवाक्यात आजही नाही. त्या वेळी ते किती कठीण असेल? हे लक्षात घेतलं की आबांचा विज्ञान, निर्भयता आणि नीती अंधश्रद्धा निर्मूलन अजेंडा हे कसे प्रत्यक्षात आणत असत हे समजतं. कॉलेजात असताना मी एक संप पुकारला. मागण्या मान्य होत नव्हत्या. प्राचार्य हे आबांना चर्चेत सहभागी करून घेणार होते. तेव्हा त्या भीतीने मी संप गुंडाळला, पण माझ्या या बंडाबद्दल आबांनी मला दोष न देता उलट त्याचं समर्थनच केलं. लोकशाही व्यवस्थेत स्वत:वरील अन्यायाविरोधात नि:शस्त्र तरीही निर्भीडपणे दाद मागण्यासाठीचा एक मार्गही वापरला ही त्यांच्यासाठी एक आनंदाचीच बाब होती. हेच त्यांच्या प्रतिक्रियेतून मला कळले. समाजाला नुसते उपदेशाचे डोस नको असतात. ते देणार्‍यांना समाज एका मर्यादेपर्यंतच सहन करतो. वेळ आली की असे उपदेश देणारे सामाजिक नव्हे तर व्यक्तिगत जीवनातही टाकाऊच ठरतात. इतक्या वर्षांनंतर आबांच्या व्यक्तीरेखेबद्दल अनेकांना जो आदर दिसतो, त्यातून त्यांनी आपले जीवन कसे अमर आणि अजातशत्रू बनविले होते ते आम्हाला कळते आणि आपण अशा थोर व्यक्तीला त्याचा वारस म्हणून न्याय देण्याच्या नुसत्या कल्पनेनेच आत्यंतिक पण स्वाभाविक दडपण जाणवते, परंतु हे दडपणही आम्ही अभिमानाने मिरवले आणि आजवर त्यांचे विचार जगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आबांच्या सामाजिक आणि राजकीय वलयाचा गैरफायदा न घेता एक विज्ञान शिक्षक म्हणून अनेक वर्षे मी काम केले ते या प्रयत्नांचा भाग म्हणूनच. अनेक संधी समोर असताना आबांच्या विचारानुसार देशाला वैज्ञानिक दृष्टी असणारा समाज प्रदान करण्याचे माध्यम म्हणून शिक्षण क्षेत्राची निवड केली. त्यामागे हीच जाणीव होती की समाजाचा खर्‍या अर्थाने सर्वांगीण विकास करावयाचा असेल, तर शिक्षण हेच एकमेव औषध आहे. या भावनेतून आबांनीही शिक्षणक्षेत्रात काम केले. त्याचा अवाढव्य विस्तार स्व. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनेक विद्यासुंकुलांच्या रूपाने आपल्याला दिसत आहे.आज पुण्यतिथीच्या निमित्ताने आबांबद्दल भावना आणि विचार मला समाजातील अनेक घटकांपर्यंत एकाचवेळी पोहचविता आल्याचा आनंद वाटतो. आबा अर्थात स्व. जनार्दन भगत यांच्या नावाने सुरू असलेला हा शिक्षणयज्ञ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे पुढे चालू ठेवण्याचे कार्य आपण सर्व जण करीत आहात, त्यात माझा नेहमीच सक्रिय सहभाग राहील. धन्यवाद!

 -संजय भगत

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply