परस्परविरोधी तक्रार दाखल
पेण : प्रतिनिधी
वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील कोंडवी पाबळ येथे लग्नाच्या वरातीवर हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी जाब विचारण्यास गेलेल्या साक्षीदारांनाही मारहाण करण्यात आली. महिला फिर्यादी अलका अनंत कदम (रा. कोंडवी ता. पेण) यांच्या मुलाची बुधवारी (दि. 4) रात्री 10.30 वाजता लग्नाची वरात गावातील नरेश शिंदे यांच्या घरासमोरून जात असताना आरोपी ज्ञानेश्वर कदम याने त्याच्या घराच्या गॅलरीतून काचेच्या रिकाम्या बाटल्या फेकुन मारल्यामुळे वरातीतील दोन महिला जखमी झाल्या. तेंव्हा साक्षीदार अलका कदम या जाब विचारण्यास गेल्या असता त्यांच्या अंगावर मसाला फेकला. त्या वेळी अलका कदम यांना वाचविण्यासाठी गेलेल्या केतन कदम यांना जगन्नाथ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी व दमदाटी केली. हरिभाऊ शिंदे याने लाकडी दांडक्याने अलका कदम यांना मारहाण केली. त्यात त्यांच्या उजव्या हाताच्या पंजाला दूखापत झाली. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार म्हात्रे हे करीत आहेत. दुसरे फिर्यादी नरेश हरिभाऊ शिंदे (रा.कोंडवी, ता. पेण) यांच्या घरासमोरून बुधवारी रात्री आरोपी केतन कदम (रा. कोंडवी, ता. पेण) याच्या भावाची वरात जात असताना आरोपी केतन कदम याने फटाके वाजविले. त्याच्या आवाजाने फिर्यादी यांची लहान मुलगी रडू लागली. तेव्हा साक्षीदार यांनी आरोपी येथे फटाके लावू नका, असे सांगितले. या गोष्टीचा राग येवुन आरोपी केतन कदम याने साक्षीदार नरेश शिंदे यांना दमदाटी केली. त्यानंतर आरोपी केतन कदम, रामभाऊ कदम व इतर पाच जणांनी घरावर दगडफेक केली व काही जणांनी दरवाज्यावर लाथा मारुन दरवाजा तोडुन नुकसान केले व घरात शिरून हाताबुक्क्याने मारहाण करून शिविगाळी व दमदाटी केली. याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार राजेंद म्हात्रे करीत आहेत.