लातूर ः प्रतिनिधी
कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन महिला व दोन तरुणी अशा पाच जणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 14) लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात किनगाव येथे घडली. मृत महिला या परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील मजूर पाच महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यात आहे. ऊसतोड महिला शनिवारी सकाळी तुळशीराम तांडा येथील तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवत असताना अचानकपणे एक मुलगी बुडत असल्याचे दिसू लागल्याने एकापाठोपाठ एक अशा चौघींनी वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने या पाच जणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये राधाबाई धोंडिबा आडे (45), दिक्षा धोंडिबा आडे (20), काजल धोंडिबा आडे (16, सर्वजण रा. रामापूर तांडा, ता. पालम, जि. परभणी), सुषमा संजय राठोड (21), अरुणा गंगाधर राठोड (25, दोघीही रा. मोजमाबाद तांडा, ता. पालम, जि. परभणी) यांचा समावेश आहे. गावकर्यांनी तलावाकडे धाव घेऊन बुडालेल्या पाच जणींना पाण्याबाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …