Breaking News

चेन्नईची विजयी घोडदौड; हैदराबादची हाराकिरी सुरूच

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी लागोपाठ पाचवा विजय नोंदविला. फाफ डुप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने हैदराबादने दिलेले 171 धावांचे आव्हान अगदी सहज पूर्ण केले. ऋतुराज गायकवाडने 44 चेंडूंत 75 धावा आणि फाफ डुप्लेसिसने 38 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी केली. हैदराबादकडून फक्त राशिद खानला 3 विकेट्च मिळाल्या, तर इतर गोलंदाज अपयशी ठरले.

डेव्हिड वॉर्नर आणि मनीष पांडे यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर हैदराबादची सुरुवात खराब झाली. जॉनी बेयरस्टो स्वस्तात बाद झाला, पण वॉर्नर आणि मनीष पांडेच्या जोडीने डाव सावरला. वॉर्नरने 55 चेंडूंमध्ये 57 आणि मनीष पांडेने 46 चेंडूंमध्ये 61 धावांची खेळी केली. केन विलियमसन 10 चेंडूंमध्ये 26 धावांवर आणि केदार जाधव 4 चेंडूंमध्ये 12 धावांवर नाबाद राहिले.

आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये केदार जाधव अपयशी ठरल्यामुळे त्याला टीमबाहेर बसवण्यात आले होते, तर आयपीएल लिलावाआधी चेन्नईने केदार जाधवला रिलीज केले होते. त्यामुळे मनीष पांडे आणि केदार जाधव यांनी त्यांच्या या कामगिरीतून बदला घेतला. चेन्नईकडून लुंगी एनगिडीला सर्वाधिक 2 विकेट्स मिळाल्या, तर सॅम करनने एक विकेट घेतली.

या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टीममध्ये दोन बदल केले. ड्वॅन ब्राव्हो आणि इम्रान ताहीर यांच्याऐवजी लुंगी एनगिडी आणि मोईन अलीला संधी देण्यात आली, तर हैदराबादनेही टीममध्ये दोन बदल केले. संदीप शर्मा आणि मनीष पांडे यांचे टीममध्ये पुनरागमन झाले आहे.

चेन्नईचा गुणतालिकेत आरसीबीला मोठा धक्का

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादवर सहज विजय साकारून या विजयासह गुणतालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीला मोठा धक्का दिला आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईच्या संघाने पाचपैकी चार सामने जिंकले होते, तर त्यांना एका लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी चेन्नईचे आठ गुण होते आणि ते दुसर्‍या स्थानावर होते, पण बुधवारच्या विजयासह चेन्नईच्या संघाचे 10 गुण झाले आहेत. सध्याच्या घडीला चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान 10 गुण झाले आहेत, पण सर्वोत्तम रनरेटच्या जोरावर चेन्नईने अव्वल स्थान पटकावले आहे, तर हैदराबादचा संघ या पराभवानंतर आठव्या स्थानावरच कायम आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply