पनेवल : प्रतिनिधी, वार्ताहर
पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कोमोठे, पनवेल, खारघर या चारही प्रभागात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 200हून अधिक दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या विसर्जन करण्यात आले. गणेशभक्तांच्या सोयी सुविधांसाठी पालिकेच्या बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, परवाना विभाग, भांडार विभाग, वाहन विभाग व वैद्यकीय विभाग या 7 विभागांच्या माध्यमातून समन्वय साधून विसर्जन घाटांवरती संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात एकुण 61 ठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली होती. यामध्ये खारघरमध्ये 37 ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 47 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. कळंबोली प्रभागामध्ये नऊ ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत येथे 66 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. कामोठे प्रभागामध्ये सहा ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 26 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. पनवेल प्रभागामध्ये नऊ ठिकाणी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61 गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. चारही प्रभागांमध्ये कृत्रिम तलाव, विद्युत व्यवस्था, मंडप, बॅरिगेटिंग, गणेश मूर्तीची नोंदणी, लाऊड स्पीकर, लाईफ जॅकेट, तराफा निर्माल्य कलशाची सोय करण्यात आली आहे. विसर्जन घाटांवर महापालिकेच्यावतीने अग्निशमन दल, वाहतूक विभाग, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा व आरोग्य विभाग तसेच पोलीस विभागाच्यावतीने चोख बंदोबस्त करण्यात आला होता. विसर्जनावेळी गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने नागरिकांसाठी ऑनलाइन टाईम स्लॉट बुकिंग प्रणाली विकसित करून दिली होती. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.