लोहोप गावासाठी मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे लोहोप गावासाठी आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
उरण मतदार संघात व खालापूर तालुक्यात असणार्या लोहोप गावात येथील आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतून पसरणार्या चारकोळ पावडरमुळे लोहोप व बाजूच्या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. यासंदर्भात उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी अधिवेशनात आवाज उठविला होता. कंपनीने गावकर्यांच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करावा, अशा आशयाचे पत्र आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले होते. त्या अनुषंगाने आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीतर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत लोहोप गावाकरीता आरओ वॉटर सप्लाय युनिटचे उद्घाटन करण्यात आले.
खालापूर तालुक्यातील तळवली-लोहोप येथे आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनी असून या कंपनीत निर्माण होणारी प्रदूषण युक्त काळी पावडर लोहोप तसेच आजूबाजूच्या परिसरात हवेद्वारे पसरत असून सर्व झाडे, शेतजमिनी, भातशेती, पिण्याचे पाणी तसेच वातावरणातील हवेत प्रसारित होत असल्याने ग्रामस्थांना श्वसन तसेच सबंधित जिवघेण्या आजारांना सामोरे जावे लागते. यामध्ये विशेषत: लहान मुले, वृद्ध व गरोदर महिला यांच्या आरोग्यास अधिक धोका संभवतो. त्यामुळे परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता आदित्य बिर्ला हायटेक कार्बन कंपनीमार्फत होणारे हवा प्रदूषण थांबविण्यासंदर्भात सबंधित अधिकार्यांना चौकशीचे आदेश द्यावेत, असे पत्र आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले होते. या मागणीची दखल घेत कंपनीनेतरी गावासाठी एखादी योजना राबविली. त्याबद्दल गावकर्यांनी आमदार महेश बालदी यांचे आभार मानले आहेत.