गतीमान कार्यवाहीचे आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः बातमीदार
दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या दिव्यांगांच्या स्टॉलकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली असून 14 भूखंड हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही झालेली आहे. या अनुषंगाने सदर कामाला गती देऊन दिव्यांग व्यक्तींना लवकरात लवकर स्टॉल उपलब्ध करून देण्याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता विभागाची बैठक घेत आगामी एका महिन्याच्या कालावधीत याबाबतची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी, असे आदेश दिले.
दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. वाशी येथील महानगरपालिकेचे ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र हे एकाच छताखाली विविध प्रकारच्या दिव्यांगांना शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा उपलब्ध करून देणारे देशातील अग्रगण्य केंद्र आहे.
स्थापत्य विभागानेही त्यानुसार सिडकोने हस्तांतरित केलेल्या भूखंडांचा वापरासाठी योग्य प्रकारे विकास करण्याची कामे समांतरपणे एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. स्टॉलची निर्मिती करतानाही दिव्यांगांच्या दृष्टीने विचार करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही आयुक्तांनी निर्देशित केले. स्टॉलमध्ये दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था योग्य रितीने असावी याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. त्याचप्रमाणे या कामासाठी भूखंड विकसित करताना तेथे आवश्यक सुविधांची पूर्तता करावी आणि दिव्यांगांना वापर करणे सुलभ होईल अशाप्रकारे प्रसाधनगृहांची व्यवस्था असण्याची काळजी घेण्यात यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
सदर 14 भूखंडांची पाहणी संबंधीत विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांच्या समवेत करावी असे सूचित करतानाच आयुक्तांनी काही भूखंडांना मालमत्ता विभागाचे उपायुक्त आणि शहर अभियंता यांनीही संयुक्तपणे भेट देऊन पाहणी करावी असे निर्देशित केले. आगामी एक महिन्यात सदर भूखंडांचा वापरण्यायोग्य विकास करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला देतानाच आयुक्तांनी स्टॉल निर्मिती व दिव्यांग सूची बाबतची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश मालमत्ता विभागास दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, मालमत्ता विभागाचे उपायुक्त जयदीप पवार उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आहे. सदरची कार्यवाही जलद होण्याच्या दृष्टीने नियोजनबध्दरित्या हे काम पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. -अभिजित बांगार, आयुक्त, नवी मुंबई महापालिका