Breaking News

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत रायगडातील खेळाडूंचे यश

परेश ठाकूर यांच्याकडून कौतुक अन् बक्षीस

पनवेल : रामप्रहर वृत्त
पुणे, इंदापूर आणि जुन्नर येथे झालेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत सहा खेळाडूंनी पदके पटकावली. इतक्या मोठ्या संख्येने पदके मिळण्याचे हे पहिलेच वर्ष असल्याची माहिती प्रशिक्षक पैलवान रूपेश पावशे यांनी दिली.
15, 17 आणि 20 वर्षाखालील विविध वजनी गटात खेळाडूंनी ही कामगिरी केली असून जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेत हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. या यशाबद्दल पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना रोख बक्षिसे दिली. सर्व गटातील खेळाडूंना प्रथम क्रमांकासाठी पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये तसेच प्रथम फेरी जिंकणार्‍यांना एक हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली.
यशस्वी सर्व कुस्तीपटूंनी शुक्रवारी पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष परेश ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रशिक्षक पैलवान रूपेश पावशे, समाधान आडके, क्षितिज म्हात्रे आदी उपस्थित होते.
स्पर्धेत 15 वर्षाखालील विविध वजनी गटात मुलींमध्ये ईश्वरी गळवे हिने द्वितीय, शौर्या कोळेकर, सानिका सत्रे, क्षितिजा मरागजे यांनी तृतीय, 17 वर्षाखालील गटात श्रुती दळवीने तृतीय आणि 20 वर्षाखालील मुलांच्या गटात विराज घेरडे याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या यशामुळे रायगड जिल्ह्याच्या कुस्ती क्षेत्रातील कामगिरीला नवी उंची मिळाली असून सर्व स्तरातून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

Check Also

अमृत महोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभीष्टचिंतन

पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मल्हार नेटवर्क प्रा. …

Leave a Reply