Breaking News

सेलिब्रिटीजची लग्ने गाजायला हवीतच…

विजय देवरकोडा आणि रश्मिका मन्दाना यांनी आपल्या हाय प्रोफाईल लग्नाच्या कव्हरेजच्या प्रक्षेपणाची साठ कोटीची ऑफर नाकारली म्हणजेच त्यांना आपल्या लग्नाची किंमत याहीपेक्षा अधिक आहे हे लक्षात आले असेल. सेलिब्रिटींच्या भोवतीचे जग त्यांच्या लग्नातील एकेक गोष्ट जाणून घेऊ इच्छित तर मग त्याला भारी दाम मिळणारच.
अशा वेळी लग्न होऊ घातलेल्या अशा मनोरंजन क्षेत्रातील व्यवहारी चेहरे मोहरे आपल्याही साखरपुडा, हळद, संगीत , लग्न, उखाणा, रिसेप्शन, आहेर या सगळ्या पॅकेज कव्हरेजला चांगला भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील राहिले तर आश्चर्य वाटायला नको. सेलिब्रिटीज मॅनेजमेंटला आणखी एक मोठीच संधी. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे कितीही खरं असले तरी आता मनोरंजन क्षेत्रात तरी त्या व्यावहारिक दृष्टिकोनातून जुळवल्या वा जुळल्या जातात. सेलिब्रिटींजनी कव्हरेजला पैसे मोजण्याऐवजी यू ट्यूब चॅनेल्सनी सेलिब्रिटींजना कव्हरेजसाठी किंमत द्यावी असा हा खेळ मेळ आहे.
सेलिब्रिटींच्या लग्नाच्या स्पॉन्सरशीपपासून नवरीचे मंगळसूत्राचा नामांकित ज्वेलर्स, त्यांचा साखरपुडा आयोजित केलेली ट्रॅव्हल एजन्सी, तिकडच्या एक्सलुझिव्ह फोटोंची किंमत असे अनेक व्यावहारिक फाटे फुटत आणि जोडत आता सेलिब्रिटीजची लग्ने ठरवली जाण्याच्या विक्री मूल्य असलेल्या युगात आपण पोहचलोय. मन आणि विचार जुळवण्यापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन जुळायला हवा हे कार्पोरेट युगाचे मोठेच देणं.
सिनेमावाल्याची लग्ने हा एका कलरफुल वेबसिरीजचा मसाला मिक्स विषय. त्यात उत्कंठावर्धक वळणावर बरेच काही घडलंय. त्यातील टिकली किती, कोणती, कशी आणि का हे त्यातील उपकथानक. तरी आपण कलाकारांच्या यशस्वी संसार गोष्टी जरी पाहिल्या तर त्यातही गोष्टी अनेक. त्यात काही आजूबाजूला काही फाटे फुटलेही असतील, पण तो चित्रपटसृष्टीतील वातावरणाचा, सततच्या सहवास लाभल्यामुळे झालेला परिणाम असावा असा आपण निष्कर्ष काढू शकतो. गॉसिप्स मॅगझिनमधून त्यावर किती आणि कसे रंगवून, खूलवून, वाढवून, शिजवून लिहिले गेले आणि ते सगळे रूजलं ही शस्त्रक्रिया आता अवघड आहे. फरक इतकाच की चित्रपटसृष्टीतील अनेक प्रेम प्रकरणे चित्रपटाइतकीच गाजली.
राज कपूर विवाहित असूनही नर्गिसजी त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटासह त्याच्या आयुष्याचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग झाल्या हे सतत सांगितले जाते. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटात नर्गिसजी सहज वावरताना दिसतात. सुनील दत्त आणि नर्गिस दत्त हे आदर्श दाम्पत्य आहे. ते ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभात आले तेव्हा नर्सिंग किती वर्षांनी कपूर खानदानातील सोहळ्यात सहभागी झाल्या ही बातमी झाली. राजीव कपूर दिग्दर्शित ’प्रेम ग्रंथ’ या चित्रपटासाठी संजय दत्तची निवड होताच पुन्हा तेच, नर्गिसजीचा आर.के. फिल्ममधील वारसा असा पुढे सुरू असे म्हटले गेले. काही कारणास्तव संजय दत्तला हा चित्रपट सोडावा लागला. कपूर खानदानाची गोष्ट सांगताना हे सगळेच त्यात येते.
दिलीपकुमारचे सायरा बानूशी लग्न झाले हा त्या काळातील सांस्कृतिक धक्काच होता. राजेंद्रकुमार सायरा बानूत विशेष रस घेत असतानाच ती दिलीपकुमारची पत्नी झाली. तोपर्यंत एखाद्या चित्रपटात एकत्र काम करण्याचा योग त्यांना आला नव्हता, तो त्यानंतर ’गोपी’ (1970) पासून आला. अशातच 1982 साली दिलीपकुमारने हैदराबाद येथील अस्मा हिच्याशी केलेले दुसरे लग्न अल्पायुषी ठरले.
राजेश खन्ना आणि अंजू महेंद्र यांच्या घट्ट मैत्रीचे किस्से नाक्यावर, अड्ड्यावर, गच्चीत गाजत असतानाच राजेश खन्नाने डिंपल कपाडियाशी अचानक लग्न केले आणि सामाजिक सांस्कृतिक माध्यम क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटली. ’बॉबी’ चित्रपटाचा क्लायमॅक्स चित्रीत होण्यापूर्वीच असा टर्न आणि ट्विस्ट आला. राज कपूरचे फाईड म्हणून डिंपल कपाडिया फोकसमध्ये होती. अशातच ती श्रीमती राजेश खन्ना झाल्याने मोठाच आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांनाच एकदम चकमा देणे म्हणजे काय ते हे होते. अन्जू महेंद्रने काही वर्षांनी इम्तियाज खानशी लग्न केले. आजही ती राजेश खन्नाची मैत्रीण म्हणून चर्चेत असते. चित्रपटसृष्टीतील लग्नाची गोष्टी सहजी न संपणारी. अक्षयकुमार आणि रविना टंडन यांच्या प्रेमप्रकरणात विघ्न आले आणि अचानक अक्षयकुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले. तिची आणि जितेंद्रचा भाचा अभिषेक कपूर यांची दोस्ती गाजत होती. एका लग्नामागे किती आणि कशा कशा गोष्टी असतात बघा. अजय देवगण आणि रविना टंडन यांच्याही मैत्रीचे किस्से गाजले. आणि त्यातूनच तिला ’दिव्यशक्ती’ या चित्रपटात संधी मिळाली.
माधुरी दीक्षितच्या लग्नाची गोष्ट खूपच वेगळी. एका सुपर स्टारचे हे लग्न आहे. मला आठवतंय, मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकाराना आरजू या चित्रपटाच्या शूटींग रिपोर्टिंगसाठी पनवेल येथील सुर्वे फार्मवर नेले असता आम्हा सिनेपत्रकारांशी होत असलेल्या औपचारिक गप्पांत तिच्या लग्नाचा निघालेला विषय तिने चलाखीने टाळला. त्या दिवसांत ’तू लग्न कधी करणार?’ या प्रश्नाने तिला गॉसिप्स मॅगझिननी भंडावून सोडले होते आणि ती काही केल्या उत्तर देत नव्हती. अगदी 1999 साली आपल्या वाढदिवसानिमित्त तिने मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चायनीज फूडची छान पार्टीदेखील दिली. तेथेही आपल्या लग्नाचा विषय तिने शिताफीने टाळला.
अशातच 5 नोव्हेंबर 1999 रोजी रात्री दहा वाजताच्या आपल्या वार्तापत्रात ‘आज तक’ने खास खबर देत म्हटले, माधुरी दीक्षितने अमेरिकेत डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. ही ब्रेकिंग न्यूज म्हणजे जोर का धक्का धीरेसे लगे असा मामला होता. सोशल मीडियाच्या आगमनापूर्वीचे ते दिवस होते. श्रीराम नेने दिसतात कसे हा यातील सर्वात मोठा प्रश्न होता. प्रचंड कुतूहल वाढत वाढत गेले. बरेच दिवस उत्तर मिळत नव्हते. हे लग्न 17 ऑक्टोबर रोजी झाले हे समजले. अखेर मुंबईतील अंधेरी येथील द क्लब येथे या लग्नाचा अतिशय ग्लॅमरस असा स्वागत सोहळा रंगला. आज तक वृत्त वाहिनीवर काही मिनिटांचे लाईव्ह वृत्त दाखवले. मराठी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरची ही नवदाम्पत्याच्या आकर्षक फोटोसहची बातमी झाली. कशी वळणे घेत घेत या लग्नाची गोष्ट रंगतदार ठरली यावर एक एपिसोड होईल. असेच आणखी एक रंगतदार लग्न… अमिताभ बच्चनच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका इव्हेंटसमध्ये ऋषि कपूरने जाहीर केले की, अभिषेक बच्चन कपूर खानदानाचा जावई बनणार. लगोलग बातमी झाली, अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार… काही दिवस होताहेत तोच कुजबुज सुरू झाली अभिषेक बच्चन आणि करिश्मा यांच्यात कशावरुन तरी बिनसलं. काही दिवसांनी चर्चा रंगली, जया बच्चन यांची इच्छा आहे, रानी मुखर्जी आपली सून व्हावी. अमिताभला वाटत होते, ती जागा ऐश्वर्या रॉयला मिळावी. उचे लोग उंची पसंत असा हा मामला. अखेर जुहू येथील दहाव्या रस्त्यावरील प्रतीक्षा बंगल्यावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा विवाह सोहळा पार पडला. तीन दिवस हे लग्न चाललं.
विजय देवरकोडा आणि रश्मिका मन्दाना यांच्या विवाहानिमित्त हा एक फ्लॅशबॅक. फिल्मवाल्यांची लग्न हा बहुरंगी बहुढंगी असा विषय. त्यातील काहींच्या संसाराचा रंग फिकट पडला, तर काहींच्या संसाराचा रंग पार उडाला… सेलिब्रिटीजची लग्ने हा अनेक वळणे घेत घेत रंगणारा विषय नक्कीच आहे. एकासारखे दुसरं लग्न नाही. श्रीदेवीने विवाहित बोनी कपूरशी लग्न करण्यामागे एक भावनिक कारण होतं, बोनी कपूर निर्मित आणि राज कंवर दिग्दर्शित ’जुदाई’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात श्रीदेवीची आई आजारी होती आणि मग अमेरिकेत तिच्यावर उपचार सुरू असताना बोनी कपूर श्रीदेवीचा अतिशय मोठा आधार होता. त्यातूनच ते नाते जुळले आणि मग त्याचे रूपांतर प्रेमात व मग लग्नात झाले. सगळीच लग्ने फिल्मी नसतात. काही संवेदनशीलही असतात…

  • दिलीप ठाकूर -चित्रपट समीक्षक

Check Also

उलवेतील कबड्डी स्पर्धेचा रविवारी पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्तदानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्ताने …

Leave a Reply