Breaking News

कोपरी उड्डाणपुलाला भाजपचा विरोध

काम थांबविण्यासाठी आमदार गणेश नाईकांचे पालिका आयुक्तांना पत्र

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नल उड्डाणपुलाचे काम रद्द करून अनावश्यक कामांवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेच्या आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्र देऊन केली आहे. या संदर्भात नवी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची मंगळवारी (दि. 24) भेट घेऊन या उड्डाणपुलाचे काम त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे.

या उड्डाणपुलासाठी प्रस्तावित असलेल्या 390 झाडांच्या तोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध वाढत आहे. अशातच उड्डाणपुलाचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप करत आमदार नाईक यांनीही या उड्डाणपुलाला विरोध केला आहे.

राज्यातील सत्ताधारी घटक पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या दबावाखाली त्याच्या नातेवाईकाला देण्यात आले असल्याचा आरोप आमदार नाईक यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला असून हे कंत्राट देताना नियमांचे सर्रास उल्लंघन झाले असून 20 टक्के जास्तीच्या रकमेची निविदा मंजूर करण्यात आली आहे, असेही नाईक यांनी सांगत उड्डाणपुलाचे कंत्राटच रद्द करावे, अशी मागणी केली आहे. पालिका आयुक्त बांगर यांची भाजप शिष्टमंडळाने भेट घेत आयुक्तांना गणेश नाईक यांचे पत्र दिले. नवी मुंबई महापालिका नगरसेवकपदाचा कालावधी विसर्जित झाल्यापासून राज्यातील सत्ताधारी घटक पक्षातील एका नेत्याची मर्जी राखण्याकरिता महापालिकेमार्फत अनावश्यक कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. ठराविक प्रभागांमध्येच कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत, ही अनावश्यक कामे राजकीय दबावाखाली करण्यात येत असून शहरात अनावश्यक कामे करून नवी मुंबईकरांच्या पैशाची लूट करून कोणाला तरी गैरमार्गाने लाभ मिळवून देण्याकरिता हे सर्व सुरू आहे. पामबीच मार्गावरील अरेंजा सर्कल ते कोपरी हा अनावश्यक उड्डाणपूल बांधण्याचे काम घाईघाईत मंजूर करून त्याची वर्कऑर्डर महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. वाहतुककोंडीचे कारण सांगून पाम बीच मार्गावर उड्डाणपुलाचा घाट घालण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी राहणारी वाहने हटवली तर वाहतुककोंडी निर्माण होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

या शिष्टमंडळात माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, रवींद्र इथापे, दशरथ भगत, डॉ. जयाजी नाथ, निशांत भगत आदींचा समावेश होता.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply