गेले काही आठवडे महाराष्ट्रात राजकारणाची धुळवड सुरू होती. त्यामुळे सर्वांचाच जीव काहिसा उबगला असेल. कडक उन्हाच्या झळा सुरू असताना अचानक सुखद पर्जन्यधारांचा वर्षाव व्हावा तशी काहिशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील दोन भाषणांमुळे झाली आहे.
देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. वारकर्यांच्या अफाट समुदायासमोर समयोचित भाषण करून पंतप्रधानांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलेच, परंतु भाषणादरम्यान त्यांनी तुकोबा माऊलींच्या रचनांचे तोंडपाठ दाखले देत उपस्थितांना आश्चर्यचकित केले. विकास आणि अध्यात्म या दोन्ही मार्गांवर हातात हात घालून चालायला हवे असा विचार पंतप्रधानांनी मांडला. संतांच्या शिकवणीतूनच आपल्याला विकासाच्या प्रेरणा मिळतात. लोकल ते ग्लोबल हा विचारदेखील संत वाङ्मयातूनच सर्वप्रथम व्यक्त झाला, तसेच अंत्योदयाची कल्पनादेखील तुकोबा माऊलीनेच आधी मांडली असे त्यांचे प्रतिपादन होते. ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले। तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा।’ हा अभंग अंत्योदयाची संकल्पनाच मांडतो असे ते म्हणाले. पंतप्रधानांची देहूवारी अनेकविध गोष्टींमुळे गाजली. याच भाषणामध्ये त्यांनी पालखीमार्गाच्या रस्तेबांधणीसाठी 11 हजार कोटी रुपयांची योजना हाती घेतल्याचे जाहीर केले. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणामुळे वारकर्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. हजारो वारकरी तुकोबा रायांच्या चरणी लीन होण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या भाषणात तल्लीन होण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. परंतु पंतप्रधान कार्यालयाच्या शिष्टाचारानुसार त्यांना भाषण करता आले नाही. त्याचेही मोठे राजकीय भांडवल करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसने सोडली नाही. कुठल्याही गोष्टीचे राजकारण कसे करावे हे महाराष्ट्रातील विद्यमान सत्ताधार्यांकडून शिकले पाहिजे. खरे तर शिकू नये असेच म्हणायला हवे. देहू येथील सभा झाल्यानंतर पंतप्रधानांनी क्षणाचाही वेळ न दवडता मुंबई गाठली. समुद्राचा शेजार लाभलेल्या राजभवन परिसरातील ‘जलभूषण’ ही नवी इमारत आणि नव्याने उभारण्यात आलेली ‘क्रांतिगाथा’ गॅलरी यांचेही उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळीही उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मोजके आणि समयोचित भाषण केले. उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपली खंत व्यक्त केली. ती खंत होती इतिहासाप्रती आपल्या समाजात असलेल्या उदासिनतेविषयी. राजभवन परिसरामध्ये काही काळापूर्वी ब्रिटिशकालीन भुयार आढळून आले होते. त्याचे वृत्त देखील प्रसिद्धी माध्यमांनी ठळकपणे दिले होते. परंतु अशी भुयारे आणि बंकर इतिहासाचे साक्षीदार असतात. त्यांचा शोध लागण्यासाठी आपल्याला 70 वर्षे का लागावीत असा खंतयुक्त सवाल पंतप्रधानांनी केला. मुंबईचे राजभवन हे अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. महात्मा गांधींनी ‘चले जाव’ची हाक दिली, ते ठिकाण देखील राजभवनापासून दूर नाही. स्वातंत्र्यलढ्यामध्ये अगणित अनामवीरांनी आपल्या आयुष्याचा होम केला. त्यांच्या स्मृती जतन करण्याचे कर्तव्य आपल्याला पार पाडावेच लागेल. तेच आपले उत्तरदायित्व आहे असे पंतप्रधानांनी आपल्या ओजस्वी भाषणात सांगितले. आपल्या देशाला लाभलेले पंतप्रधान किती चिंतनशील व्यक्तिमत्वाचे आहेत याचे पुरावे देणारीच ही दोन भाषणे होती. विकास आणि अध्यात्म या दोन्ही घटकांचा त्यात समावेश होता.